पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व त्या लग्नानंतर तो देवीच्याच वेशात म्हणजे चोळी-लुगडं नेसतो. हातात चौंडकं गेऊन तो जोगतीणींच्या बरोबर फिरत असतो. तो स्त्री वेश धारण करून हातात बांगड्या भरतो. केस लांब वाढवतो. बाईसारखा वागतो बोलतो. देवदासीच्या विवाहात या जोगत्यांना काही विधीत महत्त्व असते.

 ज्या मुली देवीला नवसाची पूर्ती म्हणून सोडल्या जातात त्यांना जोगतीणी म्हणतात. त्यांना देवदासी म्हणतात. या देवदासीनी किंवा जोगतीणींना देवीशी विवाह झाल्यावर समाजात प्रतिष्ठा असते. यांच्याजवळ देवीचा 'जग' असतो.

 हा 'जग' म्हणजे मोठी परडी असते, त्यातला मधोमधी देवीचा मोठा पितळी मुखवटा असतो. त्याला हळद कुंकू लावलेले असते. त्याच्या गळ्यात कवड्यांची माळ घातलेली असते. मोरपिसे व आरसेही भोवती लावलेले असतात.

 डोक्यावर हा जग घेऊन जोगत्याच्या बरोबर जोगतीणी फिरत असतात.

 यल्लमाच्या जोगतीणीचे तीन प्रकार मानले जातात. एक बाळ जोगतीण, दुसरी गरती जोगतीण व तिसरी विधवा जोगतीण. बाळ जोगतीण म्हणजे जिला बालवयातच देवीसाठी सोडलेली असते. हिला पवित्र मानतात. यल्लमाच्या नवसपूर्तीत वा लिंब नेसणे वगैरे सारख्या विधीमध्ये हिला मान दिला जातो. गरती जोगतीण म्हणजे ज्या स्त्रिला लग्नानंतर देवाला सोडले जाते. यात्रेचे बंधन तिला असते. पाच घरी जोगवा मागून त्यावर ती प्रतिष्ठेने राहते.

 विधवा जोगतीण म्हणजे नवरा वारल्यानंतर जी स्त्री जोगतीण बनते. तिला जोगवा मागता येतो.
 या जोगतीणीजवळ असणाऱ्या देवीच्या पवित्र वस्तू ती प्राणपणाने सांभाळत असते. त्यात जग, परडी, चौरी किंवा चामर, चौंडकं, टाळ, तुणतुणं वा सुती, भंडाऱ्याची पिशवी, कवड्यांची माळ, दर्शन यांचा समावेश असतो.

 जग म्हणजे देवीचा मुखवटा हा घेऊन जोगवा मागितला जातो. लोक त्याची पूजा करतात. लिंब नेसण्यावेळी हा जग घेऊन जोगतीणी त्या-त्या घरी जात असतात.

 ज्या मोठ्या टोपलीत हा जग ठेवलेला असतो त्याला परडी म्हणतात. या परडीत एक छोटी परडी ही असते. जोगतीणीच्या लग्नसमारंभात या परड्यांचे पूजन केले जाते.

 चौरी किंवा चामर हे यल्लमाच्या बाबतीत तिबेटी बैलाच्या शेपटाचे बनवतात असा उल्लेख येतो. देवीवर ढाळण्यासाठी चौरीचा उपयोग होतो. घरच्या देव्हाऱ्यात ते अडकवून ठेवतात. चौरी घराबाहेर नेत नाहीत.

 चौंडकं हे एक वाद्य आहे. त्याचा 'टाँग टुंग टंगा डग' असा आवाज येतो. ही पवित्र वस्तूच मानली जाते.

 भेटासूर आख्यानामध्ये

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ५३॥