पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा तिच्या भक्तांनी तिला ओळखले व 'तू का इकडे आलीस असे विचारले तेव्हापासून रेणुकेला तेथील लोक 'तुकाई' म्हणू लागले व तिची यात्रा भरवू लागले'.

 महाराष्ट्रातून देवी रेणुका कर्नाटकात आली. धारवाड जिल्ह्यात सौंदत्ती गावाजवळ तिच्या कानडी भक्तांनी यल्ल अम्मा' असं कानडीत विचारलं. इथं 'यल्ल' म्हणजे कोणीकडे व 'अम्मा' म्हणजे आई यावरून मग तिला ‘यल्लम्मा' म्हणून ओळखले जाऊ लागले.

 काही जण रेणुका, एकवीरा व यल्लम्मा ही एकाच देवीची नावे मानतात. रेणुका सहस्त्रनामात याचा उल्लेख सापडतो. एकवीरा देवीच्या माहिती अनुरोधाने

एकवीरेति विख्याता सर्वकाम प्रदायिनी
अदितिर्यामदंबा सा संभविष्यति भूतले
जनिस्यमि न संदेहः पंचपुत्रान्मनोरथान',

(सह्याद्रि खंड ले. जे. नी. डिकुन्हा)

 हा श्लोक येतो. यानुसार
 आदितीने तप केल्यानंतर शंकराने तिला वर दिला. त्यानुसार तुझा अवतार भूतलावर इश्वाकू वंशातील रेणुराजाचे घरी होईल. त्यावेळी तुझे मूळ नाव रेणुका असे असेल; परंतु भूतलावर मात्र तू 'एकवीरा' या नावाने विख्यात होशील, तसेच तुला पाच पुत्र होतील.

 रेणुकेलाही पुढे जमदग्नीपासून पाच पुत्र झाल्याचा उल्लेख आहे.

 हे सगळं ध्यानात घेतलं तरी सौंदत्तीचे यल्लम्माचे देवस्थान खूप प्रसिद्ध पावलेले असे आहे. जमदग्नींच्या म्हणण्याप्रमाणे देवीला इथं खूप भक्तगण लाभले. सौंदत्ती कोल्हापूरपासून दक्षिणेस साधारण ११० मैलावर आहे. सौंदत्ती या प्राचीन राजधानीच्या शहराच्या आग्नेय दिशेला पाचसहा मैलावर या टेकड्या आहेत. या टेकड्यांच्या माथ्यावरून सरस्वती नदी उगम पावते. पुढे ही नदी मलप्रभेला मिळते. हिलाच ‘मनोळी' म्हणतात.

 यल्लमाचे मंदिर नक्की कोणी स्थापन केले हे समजत नाही; पण कोणी भूमाप्पा नायकाने मंडपाचा वरील भाग बांधलेचा उल्लेख तिथल्या शिलालेखात आहे. हा शिलालेख 'शके १४३६ भावनाम संवत्सरे' अशी वर्षाची नोंद असलेला आहे. यल्लमा देवीचा जो उपासक वर्ग आहे. त्याला 'जोगती' आणि 'जोगतीण' असे म्हणतात.

 हे जोगती आणि जोगतीण म्हणजे खरं तर लोकांनी देवीला नवस बोलून ते पूर्ण झाल्यावर, नवस पूर्ण करण्यासाठी देवीला सोडलेली मुलं व मुली असतात. देवीला वाहिलेला मुलगा जोगती' बनतो, तर देवीला सोडलेली मुलगी ‘जोगतीण' बनते.

 जोगता हा यल्लमाचा उपासक त्याला 'जोग्या' असंही म्हणतात. जोग्याचे देवीशी लग्न लावतात

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥५२॥