पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनात कामवासना निर्माण झाली. त्यामुळे तिच्या डोक्यावरील घडा भंग झाला. तिच्या मनातले दिव्यदृष्टीने जमदग्नीला कळले व ते क्रोधीत झाले. त्यांनी आपल्या पाचही पुत्रांना बोलावले. रेणुकेकडून जो अपराध घडला आहे, त्याबद्दल तिचा वध करण्यास त्यांना सांगितले. पहिल्या चार पुत्रांनी आईचा वध करण्यास नकार दिला. पाचव्या परशुरामाने मात्र पित्याची आज्ञा मानली. रेणुकेचा शिरच्छेद केला. परशुरामाने आज्ञा पालन केली म्हणून मग पुन्हा जमदग्नींनी त्याला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करा' असा वर मागितला. मुलावर प्रसन्न होऊन जमदग्नीने दुसऱ्या स्त्रीचे मस्तक रेणुकेच्या धडावर ठेवायला सांगितले. परशुरामाने येणाऱ्या एका मातंगीचा शिरच्छेद केला व ते शिर रेणुकेच्या धडाला लावले. रेणुका पुन्हा जिवंत झाली; पण तिला मातंगीचे शिर मिळाले म्हणून तिने अग्निसेवन करून देह शुद्ध केला.

 काही ठिकाणी परशुराम रेणुकेला वधासाठी नेत असताना रेणुकेला अस्पृश्य (मातंग जातीतील) स्त्री दिसली. रेणुकेने (इथे रेणुकेस उल्लेख मरिअम्मा असा येतो) आपली दया यावी म्हणून तिला मिठी मारली. तेव्हा परशुरामाने दोघींचेही शीर उडवले. पुढे जमदग्नीने जेव्हा मंतरलेले पाणी व एक छडी देऊन मातेला जिवंत करण्यास परशुरामाला सांगितले, तेव्हा मातेला जिवंत करण्याच्या घाईत परशुरामाने अस्पृश्य स्त्रीचे डोके आईला लावले व आईचे डोके अस्पृश्य स्त्रीच्या धडाला लावले. मंतरलेले पाणी शिंपडून दोघींना जिवंत केले. अस्पृश्य स्त्रीचे धड व रेणुकेचे डोके असलेल्या स्त्रीला मग, मरिअम्मा म्हणून पुजले गेले, तर रेणुकेचे धड व अस्पृश्य स्त्री डोके असलेल्या स्त्रीला यल्लमा म्हणून पुजले गेले असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो.

 काही ठिकाणी जेव्हा रेणुका (मातंगीचे शीर लाभलेली) पुन्हा जिवंत झाली, तेव्हा जमदग्नी तिला म्हणाले, 'तुला जरी जीवदान मिळाले असले, तरी इतःपर मी तुझे तोंड पाहणार नाही. तुला वाट दिसेल तिकडे तू चालती हो.'

 यावर रेणुकेने पतीचे पाय धरले व विनवले 'कृपा करून मला उ:शाप द्या' यावर जमदग्नी म्हणाले, 'ठीक आहेत जिथे जाशील, तेथे मोठ्या प्रमाणात तुला भक्त लाभतील.' याच कथेत जेव्हा परशुराम रेणकेचे शीर उडवतो. ते शीर आकाशमार्गे कैलासास जाऊन शंकराच्या गळ्यातील नरमुंड्यांमध्ये ओविले गेल्याचा उल्लेख आहे.

 त्यामुळे ज्या मांगाच्या (मातंगी) बाईचे शीर रेणुकेला लावले गेले तिचे फक्त धडच उरले आहे. ते धड जमदग्नीना विचारते 'माझी वाट काय?' त्यावर जमदग्नी म्हणतात रेणुकेबरोबर तुझीही पूजा लोक भक्तिभावाने करतील.' या बोलण्यानंतर जमदग्नी नंदिकाश्रमाला तपश्चर्येसाठी निघून गेले.

 परशुरामास व मातंगीला बरोबर घेऊन रेणुका हिमालय सोडून दक्षिणेला येऊ लागली. महाराष्ट्रातील

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ५१ ॥