पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हासून खेळून। नार चालली वनाला
अंतरीचं दु:ख। काय कळे गवाराला
देहाला भिरूड। सांगून काय सार
जगाला दिसतं । झाड गं हिरवंगार
सुख माझं दुःख। दोघं मांडले दुकानी
सुखाला मिळे धनी। दुःखाला नाही कोणी।

 देह मनाला आतून लागणारं 'भिरूड', म्हणजे दुःख सांगता येत नाही. सुखाला सगळे वाटेकरी असतात; पण दुःख मात्र ज्याचं त्याला सोसावं लागतं.
 अशा वेळी हे मनातलं दुःख जवळच्या मैत्रिणीजवळ उघड करता यायचं. त्या सुखदुःख वाटून घ्यायच्या. कारण बऱ्याच वेळा बरीच दुःख ही सारखी असतात. या मैत्रिणीच्या प्रेमाची ओवी दोघींच्यातला मन ओलावा प्रगट करते

तुजा माजा भावपना  जना जायीरी नसावा
माजे तूं गड्यीनी  बोल हुरदी नटावा
तुजा माजा भावपना  घडी जाईना पारायाची
माजे तू गड्यीनी  कडी उगड दारायाची
तुजा माजा भावपना  कुनी कालीयील राळं
माजे तू गड्यीनी  नगं मनात आनू काळं

 तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही. आपल्या दोघींचे इतके जीवाभावाचे संबंध पाहून कोणीतरी काही किल्मिष निर्माण करण्याचा प्रयत्न करेल; पण तू मात्र मनात काही आणू नको आणि पुढं ओवीत ती म्हणते.

सुक सांगताना  दुक माग उचमळ
माजे तू गड्यीनी  नको पाण्यानं भरू डोळं
गडन म्या बी केली  मी गं तिला काय देऊ
माजे तू गड्यीनी  एक लवंग दोगी खाऊ

 एक लवंग दोघीत वाटून घेणारी एकजीव मैत्री दोघीत अनामिक नातेबंध निर्माण करते.
 जात्यावरच्या ओव्यांमध्ये येणारे बरेचसे शब्द ग्राम्य बोलीतील आहेत; पण त्यातही एक गोडवा आहे. मैत्रिणीला ‘गडणी' हा शब्द कानाला गोड वाटणारा हवाहवासा वाटणारा आहे. सलगी दाखवणारा आहे.
 मैत्रिणींच्या मधील निष्काम आणि जिव्हाळ्याच्या प्रेमाने नटलेल्या या ओव्या एक फार सुंदरलोकसंस्कृतीचा गाभारा ।। २८ ॥