पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धी होती. प्रजा सर्वार्थानं सुखी होती. त्या बळीचं राज्य पुन्हा येवो, म्हणणाऱ्या आमच्या माय-भगिनी औक्षणावेळी त्याची अजूनही आठवण काढतात. पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते. भेटी दिल्या जातात, प्रेम जपलं जातं. हे जगण्याला आश्वासक असं निधान असतं; पण लोकगीतात मात्र पाडव्याला पतीलाच काय पित्याला व भावालाही ओवाळण्याचे उल्लेख येतात.

पाडव्याच्या दिवशी ओवाळीलं न्हाणीवर
हिला जरीचा परकर नेणत्या बाईला
पाडव्याच्या दिवशी ओवाळीले भावा बापा
मोती मागती काफा नेणती बाई माझी
पाडव्याच्या दिवशी कशाचा बार झाला?.
यानं वही गं पूजीली सावळ्या बाळानं

 खरं तर रोजच दिवाळीच्या दिवशी आंघोळीनंतर औक्षण केलं जातं. पिठाचे मुटके ओवाळून उजव्या डाव्या बाजूला टाकले जातात; पण खऱ्या औक्षणाचा थाट भाऊबीजेचाच.
 खरं तर लोकसंस्कृतीत दिवाळीतल्या भाऊबीजेला एक माहेरसण मानले आहे. भावा-बहिणीच्या काळीज नात्याचा ओला भावबंध जपणारा हा दिवस, त्यामुळं बहिणींनी लोकगीतातून जिव्हाळ्यानं जपला आहे. वर्षवर्षभर माहेराची खुणावणारी वाट या निमित्तानं खुली होते. नाहीतर निदान त्या वाटेवरून भाऊराया तरी या दिवशी गुज पुसायला येतो. आई-बापाची याद काळजी भाऊरायाकडून खुशाली समजून पुरी होते.
 कधी लेकीला दिवाळीसाठी चार दिवस पाठवा म्हणून सांगावा धाडलेला असतो. मायेची नजर लेकीच्या वाटेवर लागलेली असते. लेकीला सासरची मंडळी पाठवतील का नाही, याची मायेला काळजी असते.

दिवाळी दिवशी दही लागतं गाईला
घोर लेकीच्या मायीला

 कारण मायेला माहिती असतं, तिचं येणं हे तिच्यावर अवलंबून नाही. लेकराला जन्माला घालायचं आणि परक्याच्या घरी द्यायचं, हे स्त्री जातीचं चिरंजीव दुःख तिला त्या क्षणी सलत राहतं.
 कधी काही भावा-बहिणीच्यात झालं असेल, तर ते मनावर घेऊ नकोस. तू काही मला वाकडा बोललास, तर काही काळानंतर तुझ्याच मनाला त्रास होईल. तुझंच काळीज दुखावेल.

 सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात भावा-बहिणीचं हे नातं खूप समंजसपणे त्यातील ओलाव्याच्या भावबंधासहित समोर येतं. दिवाळसणाला लागलेली माहेर ओढ हे या नात्याचं निमित्त बनतं.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १६३ ।।