पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा लोककथांतून लावली जाऊ शकेल असं वाटतं.
 खेड्यात दिवाळीच्या दिवसात तर शेणाच्या गौळणी करतात. या गौळणी मखमलीच्या फुलांनी, बांगडीच्या रंगीत काचांनी सजवतात. शेवटच्या दिवशी पांडव सभा करतात. पाच पांडव द्रौपदी बनवतात. हे सगळं पहाटे उठून शेणापासून करतात. या प्रथा हळूहळू लोप पावतील की काय, अशी भीती वाटते आहे. दारातले शेणसडे, त्यावर रांगोळ्यांचे गालीचे, गोपद्म दाराच्या दोन्ही बाजूला तेल घातलेल्या पेटवलेल्या पणत्या, त्या पहाटेचं रूप साजीवंत करायच्या.
 नरक चतुर्दशीला श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला म्हणून मग दारात शेणाच्या थापलेल्या उताण्या नरकासुरावर काही ठिकाणी केरकचरा टाकायचे. मग पहिल्या आंघोळीचं थंडीत होणारं कडकडीत पाण्याचं दमदार स्नान. उटणं चोळून घेणं, हा आवडीचा कार्यक्रम. आंघोळीनंतर देवाला, वडीलधाऱ्यांना नमस्कार. लक्ष्मीपूजनाचा तर आगळा थाट, झेंडूच्या माळा, रांगोळ्या, पक्वान्नाचं जेवण आणि पूजेनंतर फटाक्यांचा कडकडाट.
 कोणीतरी जाणतं माणूस मोठ्यांदा श्लोक म्हणायचं.

नमस्ते सर्व देवांना वरदासि हरे: प्रिया
या गतिस्त्वत्प्रपन्नानां, सा मे स्यात्तव दर्शनात् ॥

 त्याचा अर्थ त्या वेळी कळायचा नाही. मग आम्हाला जवळ बोलावून त्याचा अर्थ सांगितला जायचा. त्याचा अर्थ ‘हे लक्ष्मीमाते, तू सर्व देवांना वर देणारी आहेस. विष्णूला प्रिय आहेस. जे लोक तुला शरण येतात, त्यांना जी गती प्राप्त होते, ती आम्हाला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.'
 लक्ष्मीपूजनाला घरच्या बायकाही ठेवणीतल्या जरीकाठी साड्या नेसायच्या. ठसठशीत दागिने अंगावर चढवायच्या. काही दागिने, पैसे, रुपये चांदीच्या ताम्हणात घालून पूजेसाठी ठेवलेले असायचे.फळे, लाह्या, फुलं मांडून ठेवलेली असायची. दागिन्याच्या पेटीतली मोत्याची नथ लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नाकात घातली जायची. पुरुष माणसंही धोतर, जाकीट, डोक्याला फरची टोपी घालून पूजेला बसत. खरं तर आम्ही लहान पोरं त्या वेळी कधी लक्ष्मीपूजन संपतंय आणि कधी फटाक्याची मोठी माळ वाड्याबाहेर लावतोय, याची वाट पाहात बसायचो. काही जण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिशोबाच्या वह्यांचेही पूजन करत; पण वहीपूजन हे बऱ्याच जणांच्यात पाडव्याला व्हायचे.
 पाडवा दिवाळी म्हणजे बलिप्रतिपदा. खेड्यापाड्यातल्या बायका नेहमी औक्षण करताना म्हणतात,

इडापिडा टळो आणि
बळीचं राज्य येवो

 या बळीराजाला विष्णूनं वामनरूप घेऊन पाताळात घातलं. खरं तर हा बळीराजा हा दातृत्वसंपन्न, कर्तव्यसंपन्न, सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करणारा. शेतकऱ्यांचा त्राता. त्या काळात सगळीकडे

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १६२ ॥