लोकसंस्कृतीच्या सशक्त अधिष्ठानामुळेच लोकगीते जन्माला आलेली आहेत. लोकसंस्कृती आणि दैवत उपासना यांच्यासाठी या गीतांची निर्मिती झालेली आहे. तसेच महाकाव्ये, पुराणे आणि देवादिकांच्या चरित्रांचा अडाणी माणसांना परिचय करून द्यावा आणि त्यांना धर्मोपासक बनवावे, त्यांच्या श्रद्धेला आवाहन करावे, यासाठी ही गीते निर्माण झाली आहेत. या विधानाचा आणि विचाराची सत्यता पाहावयाची झाली तर आपली मराठी लावणी पाहावी. शृंगारप्रधान असलेल्या रचना म्हणजे केवळ लावणी नव्हे, तर आपल्या परंपरेत सर्व प्रकारच्या लावण्याची निर्मिती झालेली आहे. रामायणावर लावणी आहे. पुराणांवर लावणी आहे. व्यक्तीवर लावणी आहे. दुष्काळावर लावणी आहे. एवढेच नव्हे तर पंढरपूर, काशी, पैठण, आळंदी, कोल्हापूर इ. तीर्थक्षेत्रांवरही लावण्या निर्माण झालेल्या आहेत. एवढी लावणीची विविधता कशामुळे आली? लोकसंस्कृतीच्या दर्शनासाठी आणि दैवत उपासनेसाठी ही विविधता आली. सामान्य माणसाला धर्मप्रवण नि भक्तिप्रवण बनवावे, यासाठी तीर्थक्षेत्रांवरच्या लावण्या निर्माण झाल्या. म्हणून लोकसंस्कृती हा या गीतांचा प्राण आहे, पाया आहे, प्रेरणास्थान आहे. लोकसंस्कृतीच्या सुपीक मातीतून रोपाच्या रूपाने वर आलेली हिरवी जादू म्हणजे ही गीते होत, ही कवने होत. ही जाणीव जुन्या जाणत्या अभ्यासकांना पूर्वीपासून असतेच; पण या शतकातल्या तरुण वयातील वाचकाला या दोहोंचा परस्पर संबंध दाखवून देण्याची कामगिरी डॉ. राजेंद्र माने यांनी उधृत केलेल्या नानाविध रचनांमुळे सफल झालेली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
याबरोबरच समाधानाची बाब अशी, की लोकसंस्कृतीने म्हणजे तिच्या भक्त असलेल्या गीतकाराने किती नवे, देशीय, विविध आणि लवचिक वाङ्मय प्रकार निर्माण करून लोकसाहित्याला समृद्ध केले अहे. इथे ओवी आहे. अभंग आहे, पोवाडे आहे, लावणी आहे, कथागीते आहेत, स्तोत्ररचना आहे, भारूड रचना आहे, गौळण आहे आणि या वाङ्मय प्रकाराच्या जवळपास जाणारी रचनाही आहे. उदा. पोतराजाची बरीच गाणी लावणी रचनेशी साधर्म्य सांगणारी अशी आहेत. म्हणून साहित्याच्या दृष्टिकोनातून लोकसंस्कृतीने अनेक विविध काव्यप्रकार अथवा रचनाबंध आपल्या वाङ्मय परंपरेला बहाल केलेले आहेत, हे या ग्रंथातील लेखकांनी केलेल्या विवेचनातून जाणवून जाते.
या ग्रंथातील प्रत्येक लेखाचा स्वतंत्रपणे रसोत्कट आणि सांस्कृतिक अंगाने परामर्श घेता येणे शक्य असले, तरी विस्तार भयास्तव तसे करणे टाळले आहे. शिवाय खुद्द लेखकानेच एकेका विषयाची सर्वांगीण स्वरूपात मांडणी करून त्या-त्या विषयाला पूर्णत्वाप्रत नेले अहे. त्या विषयाची उत्तम ओळख करून दिलेली आहे; पण तरीही 'ओळख माझं हुमाण अर्थात् कोडं' या एका विषयाची स्वतंत्रपणे नोंद करतो. नोंद करण्याचे कारण असे, की हा लेख काही देवता