पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपासनेचा दैवतविधीचा अंगभूत घटक नाही. हा काही पुण्यप्राप्तीसाठी संस्कृतीने दिलेला पाठ नाही किंवा श्रमपरिहारासाठी अन् स्वप्नपूर्तीसाठी गायलेली जात्यावरची ओवी नव्हे किंवा एखाद्या माऊलीने आयुष्यभर घेतलेल्या कडवट अनुभवाचा हा काही नि:श्वास नव्हे. पतीचं नाव घेणं, हुमाण वा कोडं घालणं, बाळाच्या नामकरण विधीवेळी पाळणा म्हणणं, हातावर नवऱ्याचं नाव गोंदून घेणं आणि डोहाळे लागल्यावर आवडलेल्या पदार्थाची चोरून पतीकडे मागणी करणं ही या लोकसंस्कृतीची, तसेच लोकमानसाची खास बात आहे - खासियत आहे. बाकीच्या गोष्टींचा इथे विचार करण्याचे कारण नाही; पण हुमाण अथवा कोडं याचे स्वरूप पूर्णत: वेगळे आहे. इथे ग्रांथिक ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान अधिक उपयोगी पडते. सूक्ष्म सृष्टीनिरीक्षण इथे आवश्यक असते. एखाद्या वस्तूचे वेगळेपण सहजपणे लक्षात घेणे गरजेचे असते आणि विचारलेल्या कोड्याचं झटकन उत्तर देण्याइतकी स्मरणाची तल्लखता आवश्यक असते. त्याबरोबरच या कोड्यातून आपली जीवनशैली समजण्यास मदत होते, जगरहाटीचे रूप लक्षात येते, बहुविध विषयांची ओळख होते. उद्दाम कल्पकतेचे लखलखते दर्शन घडते आणि निखळ स्वरूपाचे मनोरंजनही घडत असते. म्हणून ज्या संस्कृतीत ग्रामीण जीवनाशी निगडित म्हणी आणि वाक्प्रचार अधिक प्रमाणात आढळतात, चकित करून टाकणारी कोडी खूप संख्येने प्रचलित असतात. व्यावहारिक ज्ञानाने ठासून भरलेली सूत्रे अधिक असतात. ती संस्कृती म्हणजे ती लोकसंस्कृती शहाणपण शिकविणारी आदर्श पाठशाला असते. सृष्टी, माणूस, वस्तू, पदार्थ आणि चराचर वाचता आल्याशिवाय या पाठशालेतून पास होता येत नाही. आजच्या जमान्यात माणसाजवळ वेळच नसल्याने अशा हुमाण वा कोडी घालून विरंगुळा करून घेण्याची सोय उरलेली नाही आणि थोडाफार वेळ असला, तरी जीवनाच्या पाठशाळेतून लाभणारे शहाणपण आज आम्हा विद्याविभूषित पदवीधरांकडे फारसे नसल्यामुळे खेड्यातील निरक्षर आजीबाई आपला पराभव करून टाकते हे एक कडवट सत्य आपणाला नाकारता येणार नाही. डॉ. राजेंद्र माने यांनी आपल्या या ग्रंथात उपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या पैलूचा प्रसन्न परिचय करून दिलेला आहे. याबद्दल ते खरोखर अभिनंदनास पात्र आहेत.

 डॉ. राजेंद्र माने यांच्या या चौदा लेखांतून आपल्या लोकसंस्कृतीचे अतिशय सशक्त, सर्वसमावेशक आणि जिज्ञासापूर्ती करणारे लेखन केलेले आहे. या विषयांसंबंधी त्यांनी काही नवे विचार वा संशोधन सांगितले नसले, तरी पूर्वसुरींच्या अभ्यासाचा पुरेपूर वापर केला अहे. लोकसंस्कृती विषयीची उदासीनता, आपल्या संस्कृतीविषयी असणारी तुटलेपणाची भावना, लोकमानस आणि त्यांची जीवनशैली याविषयी असणारे आमचे अज्ञान दूर करण्याचे कार्य अशा ग्रंथामुळेच होऊ शकते. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी या ग्रंथातून आपल्या लोकसंस्कृतीचे जे दर्शन घडविले अहे, ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल! डॉ. राजेंद्र माने यांनी या ग्रंथात कोणती