सारे लोककलावंत त्यांनी जिवंत केले आहेत. वासुदेव, पोतराज, जोगती-जोगतीण यांचे त्यांनी केलेले वर्णन इतके तपशीलवार, इतके सूक्ष्म आणि वास्तव आहे, की ते वर्णन वाचताच तो कलावंत मूर्तिमंत आपल्या समोर साकार होतो. नुसता साकार होत नाही, तर त्याच्या वाद्ये आणि गाण्यासह नाचत असलेल्या रूपात साकार होतो. या वर्णनामध्ये सूक्ष्म निरीक्षणाबरोबरच संशोधनाची प्रज्ञा आणि साहित्यासाठीची लागणारी रम्योज्वल प्रतिभा यांचा मनोज्ञ मिलाफ पार झालेला आहे. एखाद्या चित्रकाराने हलक्या हाताने हुकमत असलेल्या रेषांच्या आधारे एखादे रेखाचित्र काढावे आणि ते पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात उतरावे; अशी निपुणता डॉ. राजेंद्र माने यांनी चित्रित केलेल्या या लोककलावंतांच्या चित्रणात साधलेली आहे. एकूणच लोकसंस्कृतीचा ऐवज कसाही असो, त्याचा दूत म्हणून आपणासमोर उभा केलेला कलावंत एक व्यक्तिचित्रण म्हणून खचितच वाचनीय झालेला आहे. स्मरणात राहणारा झाला आहे.
हे देवदेवतांचे उपासक असलेले कलावंत त्यांच्या वेष-परिवेष आणि उपासना - विधी यांच्यासह चित्रित केलेले आहेतच; पण डॉ. राजेंद्र माने यांनी आणखी एक चांगली गोष्ट इथे केलेली आहे ती म्हणजे या कलावंतांनी म्हणलेली गाणी / गीते / ओव्या, काव्यरचना उधृत केलेल्या आहेत. उपास्य देवतांचे चरित्र व महात्म्य सांगणाऱ्या त्या अनुषंगाने भक्ती आणि धर्माचरण यांचे प्रबोधन करणारी गाणी लोकसंस्कृतीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आणि तितकीच महत्त्वाची वाटतात. या गाण्यांना वाङ्मयीन गुणवत्ता कमी असली, तरी सांस्कृतिक गुणवत्ता भरपूर आढळते. त्यातून देवदेवतांचा परिचय होतो; त्यांच्या जन्मकथा समजतात, पुराणकथांची तोंडओळख होते आणि देवतांचे उपासना विधीही लक्षात येतात. ही गीते गाणारे लोककलावंत आता काळाच्या ओघात झपाट्याने कमी होत चाललेले असल्याने त्यांच्या जोर मुखातली ही सांस्कृतिक धनसंपदा शब्दांकित करून ठेवणे आवश्यक दस्तऐवज ठरणार आहे. असा हा दस्तऐवज डॉ. राजेंद्र माने यांनी अधिकाधिक प्रमाणात संग्रहित केलेला आहे. त्यामुळे या ग्रंथाची गुणवत्ता खचितच उंचावली आहे, असे वाटते. याबरोबरच आणखी एक गोष्ट नव्या पिढीसमोर आपोआप आली अहे. ती म्हणजे अलीकडे होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात लोकगीतांचे सादरीकरण होत असते. भारूड, गौळण, लावणी यांची आवड निर्माण झालेल्या प्रेक्षकांसमोर हे प्रकार सादर केले जातात. त्यामुळे लोकसाहित्य आणि लोकगीते हा आपल्या परंपरेचा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे, अशी आपली भावना निर्माण होते. म्हणजे चार-सहा कवींच्या जशा कविता वा गीते असतात तसा हा प्रकार आहे, असे आजच्या श्रोत्यांना-प्रेक्षकांना वाटते; पण लोकगीते ही लोकसंस्कृतीच्या गाभ्याला फुटलेली फांदी आहे, याची कल्पना या ग्रंथातील विवेचनामुळे नव्या पिढीतील वाचकांना होईल. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल, की