पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 काही विनोदप्रचुर गीतेही हादग्यात गायिली जातात. त्यातून फारसं काही सुचवायचं नसतं. मन हलकं करण्याचा तो एक प्रकार असतो, त्यामुळं ताण कमी होत असावा.

श्रीकांता कमळकांता अस्सं कस्सं झालं
अस्सं कस्सं वेड माझ्या कपाळी आलं
वेडियाच्या बायकोनं केल्या होत्या शेवया
आळ्या आळ्या म्हणून त्यानं टाकून दिल्या
वेडियाची बायको झोपली होती पलंगावर
मेली मेली म्हणून त्यानं, जाळून टाकली सरणावर

या गाण्यात फक्त विनोद आहे. एकीमागून दुसरीनं हे गीत म्हणताना होणारा हास्याचा खळखळाट हादग्याच्या कार्यक्रमाला एक मोकळेपणा देणारा ठरतो.
 पती-पत्नीच्या नाजूक नात्याच्या संदर्भानं आणि सासू-नणंद-सासरा या नात्यातला कडवटपणा व्यक्त करणारं

यादवराया राणी रूसून बैसली कैसी

 हे गीत ही विनोदाच्या अंगाने झुकते. सासू, नणंद, सासरा वेगवेगळे दागिने घेऊन तिला बोलवायला येतात. रूसलेल्या सुनेची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात; पण मंगळसूत्र घेऊन नवरा आल्यावर तिची नाराजी दूर होते. यात 'मंगळसूत्र' हा स्त्रीचा अत्यंत प्रिय दागिना. तिच्या भावविश्वात पवित्र असणारा. त्याचं महत्त्वही प्रकट होतंच.
 काही असलं तरी खेडोपाड्यातल्या सोळा वर्षांखालील मुलींचा 'हादगा' हा अत्यंत आवडीचा कार्यक्रम असतो. मोठ्या आयाबायाही भोवतीनं बसून कौतुकानं मुलींनी गोल फिरत गाणी म्हटलेला भोंडला पाहात असतात. त्यानिमित्तानं त्यांनाही स्वत:चे पूर्वीचे दिवस आठवत राहतात. गाणी म्हणणाऱ्या मुलींची गाणी विसरली, तर बाहेरून या आया-माया गाणी आठवून देतात. आठवून देता देता स्वत:च म्हणायला लागतात. संध्याकाळच्या वेळचा सगळा माहोलच बदलून जातो. सत्तरीच्या आजीबाईंच्या दृष्टीच्या चौथऱ्यावर त्यांचं बालपण येऊन जातं. संसारतापातल्या अडचणी, व्यथा, राग, लोभ, भांडण सगळं विसरून सगळ्या बायकांचं या निमित्तानं एकत्र येणं, गाणी म्हणणं आणि त्यातून मन मोकळं करणं, हाही हादग्याचा मोठा भाग असतो.

 शेतकरी माणसाचं भूमीशी असणारं नातं त्याला कारणीभूत ठरणारा हस्त नक्षत्राचा पाऊस, या पावसाची देवता इंद्र, या सर्वातून फुलत जाणारा निसर्ग, शेतीतून उगवून माणसांना जगवणारं धनधान्य, समृद्धी, समृद्धी देणारी माता लक्ष्मी या सर्वांचं या हादग्याशी नातं आहे. या सर्वांचं हृदय स्मरण, त्याची पूजा म्हणजे हादगा किंवा भोंडला. 'भुलाई' म्हणजे शिव-शक्तीची पूजाच म्हणून प्रकृती आणि पुरुष

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १५८ ॥