पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांचीही पूजा असंही याचं स्वरूप आहेच. कन्नड साहित्यिक शिवराम कारंथही एका ठिकाणी म्हणतात, 'या अल्लड, निरागस, उमलणाऱ्या कन्यका गीतांबरोबर झुलताना पाहून मला जगण्याची फार मोठी शक्ती लाभते' हे सगळं पाहिलं, की वाटतं हादगा किंवा भोंडला वा भुलाई हा लोकसंस्कृतीचाच एक अनमोल ठेवा आहे. जो आमच्या माय-भगिनींनी जपला आहे. हस्त नक्षत्राला प्रारंभ झाला, की मुलींच्यात उत्साहाला उधाण येते. रोज एकीच्या घरी जमून त्या हादग्यात रमून जातात. वेगवेगळी खिरापत, जी शक्यतो कोणाला ओळखू येऊ नये, अशी बनविण्यास त्याच्या आया, आज्या त्यांना मदत करतात. मग या परकरातल्या पोरी ती खिरापत सांभाळत हादग्याला जातात, गाणी म्हणतात. ही गीतं तशी अर्थपूर्ण आहेतच; पण त्यातला नाद, ठेका, लय यामुळं ज्या अंगणात ही गीतं म्हटली जातात, ती अंगणंही जणू चैतन्याने न्हाऊन निघतात. हा लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जपला जायला पाहिजे. खेड्यापाड्याला आता शहरी वारं लागलंय. टी.व्ही. तिथंही आलाय. आता हादग्याच्या वेळा लक्षात ठेवून एकत्रित येणाऱ्या मुलींची मानसिकता बदलतीय. त्यांना आठवून गाणी सांगणाऱ्या आया, आज्या इतर कार्यक्रमात गुंतून राहताहेत. या सर्वांतून हा ठेवा जपला जाणार का, याची भीती वाटतेय; पण हे सर्व जपणंही आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवायला पाहिजे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १५९ ॥