पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्दार्थही सूचक आहेत; पण गीतरचना मात्र नाद, ताल, लय सांभाळणारी. चटकन लक्षात राहून म्हणता येणारी असते. हादग्याची गाणी ऐकून-ऐकून की, एकीच्या मागून दुसरीने म्हणून आपोआप पाठ होत जातात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ही गाणी कोणी लिहिली, याचा गीतकार कोण, याचा शोध लावता येणं अवघड आहे; पण त्या गीतामधून तिथली प्रादेशिकताही डोकावत राहते.
 सगळ्या पूजांमध्ये गणेशाचं महत्त्व प्रथम असतं. त्याला प्रथम वंदन करून मग सोहळा चालू होतो. हादग्यातसुद्धा गाण्यांची सुरवात शक्यतो गणेशाला नमन करून होते.

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूनदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशिच्या दारी
पारवळ घुमते गिरिजा कपारी
पारवणी बाळाचे गुंजवणी डोळे
गुंजवाणी डोळ्यांच्या सारविल्या टिक्का
आमच्या गावच्या भुलोनी नायका

 इथं मांडायचा तो खेळ म्हटला, तर खेळातला आणि म्हटला तर प्रपंचाचा आहे. स्त्रीच्या भावनेचा विचार केला तर हा संसाराचा खेळ गावाच्या जवळ असावा. वेशीलगतच गाव मिळावं, असाही याचा अर्थ लागू शकतो. म्हणजे माहेर जवळच राहील. अधून-मधून आप्तांना भेटता येईल. ऐल-पैल म्हणजे अलीकडे पलीकडे सासर-माहेर असाही अर्थ काढता येतो आणि इहलोक आणि परलोक असाही होतो. इहलोक-परलोक म्हटलं, की हा खेळ आध्यात्म्याच्या पातळीवरचा खेळ होतो; पण तरीसुद्धा साध्या- साध्या ग्रामीण स्त्रीनं ही रचना केली, असं मानलं तर संसाराचा, जगरहाटीचा खेळ मानावं लागतं.
 या गाण्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे एका गीतात मधूनच चाली बदलत जातात. या ऐलमाच्या गाण्यातही ‘आमच्या गावच्या भुलोनी नायका' नंतर एकदम चाल, ठेका बदलतो. मग पुढे बदललेल्या ठेक्यात तेच गीत चालू होते.

एविन गा, तेविन गा
कांडा तिळ बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया खातिल काय दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी - आयुष्य देरे बा माळी

 तिळ आणि तांदळाला धर्मसंस्कारात खूपच महत्त्व आहे. लग्नात तांदळाच्या अक्षता असतात. तिळाची शिवामूठ वाहिली जाते. या गाण्यात तिळ-तांदळाचे दुधोंडे आयांना खायला घातलेत. त्याचा त्यांना त्रास झाला म्हणून माळ्याकडे औषध मागितले जातेय. हा माळी कोण असावा?

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १५५ ॥