पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनपर्वात सोळा वर्षांखालील मुला-मुलींना पीडा देण्याचा परवाना स्कंदाने आपल्या परिवारातील देवतांना देऊन टाकलेला अहे. मातृकांचा नियंता म्हणून स्कंद पूजनीय मानला गेला, असा उल्लेख आढळतो आणि हादग्याच्या निमित्ताने हस्त नक्षत्रांची पूजा करणाऱ्या मुली सोळा वर्षांखालच्या असल्याने ही स्कंदाची पूजा असावी, यालाही आधार मिळतो.
 हादगा किंवा भोंडला याच्या पूजनविधीविषयी वेगवेगळ्या प्रथा दिसतात. प्रदेशानुसार जातीधर्मानुसार काही फरक यात झाले असावेत.
 काही ठिकाणी पाटावर डाळ-तांदळाचा हत्ती काढतात. काही ठिकाणी रांगोळीनेही हत्ती काढतात. त्याभोवती रिंगण करून गाणी म्हटली जातात.
 काही ठिकाणी हत्तीचे चित्र भिंतीवर लावतात आणि त्यासमोर फळफळावळ मांडतात. चित्राला पाना-फुलांचे हार घालतात. श्री. राजवाडे यांनी एका ठिकाणी मुली खडे वेचून आणतात व त्याचीच पानाफुलाने हादगा म्हणून पूजा करतात, असे लिहिले आहे. कदाचित कोकणस्थांमध्ये गौरीच्या वेळीसुद्धा नदीतून खडे आणून त्याचीच गौर म्हणून पूजा करतात. त्यात खड्याला महत्त्व असते, त्यातूनच ही प्रथा हादग्याच्या वेळीही आली असावी.
 काही ठिकाणी तर जिच्या घरी भोंडला वा हादगा करायचा, तिच्याकडे जाताना मुली घरातून डाळ, तांदूळ घेऊन जातात. ते जमिनीवर एकत्र पसरून त्यावर एका पुरुषाचे व एका बाईचे चित्र काढून त्याभोवती रिंगण करून गाणी म्हणतात, त्याला 'बहिलोबा' आणि 'बहिलोबाई' असे म्हणतात. धान्याच्या रूपाने ही सुद्धा समृद्धीचीच पूजा म्हटलं पाहिजे. याला भुलाई' पूजा असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. याचा एक अर्थही भिल्लाचे रूप घेतलेल्या शंकराला भुलविण्यासाठी पार्वतीने भिल्लिणीचा वेष धारण केला होता म्हणून तिला भुलाबाई किंवा भुलाई म्हटलं जातं आणि शंकराला भुलोबा. म्हणजे ही एका अर्थाने शिव-शक्तीची पूजा आहे. प्रकृती आणि पुरुषाची पूजा आहे. खानदेशविदर्भात तर भुलाई सोहळा जास्त प्रचलित आहे.
 तसा भारतीय लोकसंस्कृतीमध्ये प्रत्येक प्रतीकापाठी अर्थ लपलेला आहेच. कवड्यांच्या माळेपाठी विरक्तीचा संदर्भ येतो. तुळशीवृंदावन पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. नाग, बैल आणि घोडा ही शक्तिसामर्थ्याची व पुरुषतत्त्वाची प्रतीके आहेत. मोर हे कामतत्त्वाचे प्रतीक, तर कमळ हे स्त्रीतत्त्वाचे व जीवन उत्पादकतेचं प्रतीक, भूमी हे सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते, असा उल्लेख प्रा. द. ता. भोसले यांनी त्यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा' या ग्रंथात केला आहे.
 हत्ती हे सुद्धा प्रजननाचे प्रतीक, तर फूल हे यौवन दशेचे प्रतीक आणि फळ हे अपत्यप्राप्तीचे प्रतीक यातून मग हादग्याकडे पाहिलं, की सुफलनाची, सृजनाची पूजा असाही अर्थ सामोरी येतो.

 हादग्याच्या गाण्यात किंवा भोंडल्याच्या गाण्यामध्येही ही प्रतीकात्मकता जाणवते. या गाण्यातील

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १५४ ॥