पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐलमा पैलमा : हादगा

 आम्ही वाड्यात राहायचो तेव्हाची आठवण. वाड्याच्या मधल्या चौकात सगळ्या अवतीभोवतीच्या मुली हातात हात घालून गोल रिंगण करत, संध्याकाळच्या वेळी गाणी म्हणायच्या. गोल गोल फिरायच्या, त्या गाण्यांना एक खास ठेका असायचा, लय असायची. त्या छानपैकी त्या गाण्यात रमून जायच्या. मी तेव्हा लहान होतो. ऐकायला ते सगळं छान वाटायचं. आम्ही छोटी मुलं कोपऱ्यात उभे राहून ते पाहायचो. नंतर कळलं त्या सगळ्या मुलींमध्ये एका पाटावर कोणीतरी हत्तीचं चित्र काढलंय. त्याला फुलंही वाहिलीत. कळायला लागल्यावर त्याला 'हादगा' म्हणतात हे समजलं. लहानपणी आम्ही मुलं त्यानंतर मिळणाऱ्या प्रसादाची वाट पाहायचो. आमच्याकडे त्याला 'खिरापत' म्हणायचे. प्रत्येकीनं काहीतरी डब्यात बंदिस्त करून आणलेलं असायचं. गाणी म्हणून झाली, की खिरापत ओळखण्याचा समारंभ चालू. प्रत्येकजण वेगवेगळ्या पदार्थांची नाव घेत राहायची. जिची खिरापत ओळखली जायची नाही, तिला खूप अनंद व्हायचा. वेगवेगळे पदार्थ खिरापत म्हणून आम्हा लहान पोरांना खायला मिळायचे. वर्षातून काही दिवस चालणाऱ्या हादग्याची झालेली ती पहिली ओळख आणि सतत कानावर पडून लक्षात राहिलेली ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू' किंवा 'नंदा-भावजया दोघीजणी' वगैरे सारखी गाणी; पण हे सगळं अगदी नकळत्या वयापासून मनात साचून राहिलेलं, ठसलेलं.
 खरं तर हादगा कधी भरवतात तर 'हस्त' नक्षत्रात. हस्त हे पावसाचं नक्षत्र म्हणून सर्वांना परिचित. हत्तीचा पाऊस म्हणजे धो-धो पडणारा पाऊस; पण त्याचंही एक महत्त्व असतंच. तशी पावसाची इतरही नक्षत्र आहेत; पण तरी हस्त नक्षत्राचा पाऊस व्हावा लागतोच कारण हा पाऊस धनधान्याची मोठ्या प्रमाणात प्राप्ती करून देतो. पिकावर या पावसामुळे कीड पडत नाही, अशी शेतकऱ्यांची समजूत आहे.
 आपले बरेचसे सण, प्रथा या ग्रामीण जीवनाशी कुठे ना कुठे तरी निगडित आहेतच. त्याला अनुसरून मग ‘हादगा' याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, की संस्कृतीच्या खुणा त्यातून समोर येत जातात. ही लोकसंस्कृती सर्वसामान्यांच्या जीवनाशी किती निगडित आहे ते जाणवतं.

 मग जाणवतं, हादगा म्हणजे हस्त नक्षत्रातल्या पावसाचं लोकमानसानं केलेलं मननीय पूजनच आहे; पण ही पूजा म्हणजे नुसतं कर्मकांड नाही. तो मनापासून आनंदानं घडणारा एक सोहळा आहे. सोळा वर्षांखालील मुलीच यात समाविष्ट होतात, त्यामुळे काहीवेळा हा कुमारी उत्सव आहे, असंही वाटतं. प्रा. द. ता. भोसले यांनी हा स्कंद पूजेचा उत्सव असावा, असंही म्हटलं आहे. महाभारताच्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १५३ ॥