पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीने लौकिक आणि पारलौकिकाचा फार सुरेख समन्वय साधलेला आहे. इथे माणसातल्या 'देवत्वा'ला आवाहन केले आहे आणि देवतांना मानवाच्या पातळीवर आणलेले आहे. इथे प्रपंचाची महत्ता कथन केली आहे; पण जोडीला परमार्थही आणून ठेवला आहे. इथे जसे भोगाला स्थान आहे, तसेच त्यागालाही अधोरेखित केले आहे. भक्ती आणि आसक्ती, प्रीती आणि विरक्ती, संग्रह आणि समर्पण, उत्सव आणि उपासना, धर्म आणि कर्म, मोह आणि मुक्ती आणि व्यष्टी नि समष्टी या सर्वांचा सुरेख समन्वय आपल्या लोकजीवनात आपल्या लोकसंस्कृतीत झालेला आहे; हे त्यांनी दिलेल्या देवतांविषयक विधीमध्ये आणि देवदेवतांच्या गीतांमधून आपणास उत्तम प्रकारे जाणवतो. प्रपंचाचे स्मरण करीत असतानाही ईश्वराचे विस्मरण होता कामा नये; हा एक सनातन आणि मौलिक विचार डॉ. माने यांचे लेख वाचल्यावर आपल्या मनावर कोरला जातो आणि आजच्या देहनिष्ठ इहवादाचा स्वीकार केलेल्या समाजाच्या दृष्टीने तो आवश्यक वाटतो. त्यांचा हा ग्रंथ आपल्या लोकसंस्कृतीची सर्वंकष ओळख करून तर देतोच; पण सफल आणि कृतार्थ जीवनाचा एक मूलमंत्रही ध्वनित करून टाकतो. माणसाने कसे जगावे आणि कुणासाठी जगावे, हा विचार या ग्रंथाचा खास विशेष म्हणावा लागेल.

 हा विचार मनात बाळगून जेव्हा आपण या ग्रंथातील वाघ्या-मुरळी, पोतराज, जोगतीण, गोंधळी, वासुदेव, भारूड सादर करणाऱ्या कलावंतांकडे पाहतो, तेव्हा आपणास त्यांची वेगळीच ओळख होते. ही मंडळी म्हणजे कष्ट न करता भीक मागून जगणारी ऐतखाऊ मंडळी नव्हेत, भिक्षेकरी नव्हेत, याची आपणास कल्पना येते. अथवा देवादिकांची चार गाणी म्हणून आपले मनोरंजन करणारी कलाकार मंडळी नव्हेत. ते लोककलावंत आहेत. ते आपल्या उपास्य देवतांचे प्रतिनिधी आहेत. त्या देवतांना आयुष्य समर्पित केलेले व्रतस्थ भक्त आहेत. आपल्या प्रापंचिक जीवनाला लागलेली आसक्तीची माती धुऊन टाकणारे सेवक आहेत, हे जाणवल्याशिवाय राहात नाही. भक्ती, नामस्मरण, उपासना या गोष्टींचे स्मरण देणारे ते प्रबोधनकारही आहेत. त्यांच्यामुळेच कुलाचार, कुलधर्म व उपासना यांना सातत्य प्राप्त होते. आज आपण या मंडळींकडे ज्या दृष्टीने पाहतो; ते योग्य नव्हे हा विचार या ग्रंथाच्या वाचनातून आपल्या मनात सखोलतेने रुजतो, यात शंका नाही. एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात जशी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, तसेच लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यात या मंडळींचे स्थान आहे, असे लेखकाला सूचित करावयाचे असावे.

 डॉ. राजेंद्र माने यांनी या सर्व कलावंतांचे जे रूपदर्शन घडविले आहे, ते कमालीचे प्रत्ययकारी, चित्रमय आणि जिवंत स्वरूपाचे झालेले आहे. एखाद्या कथेत किंवा कादंबरीमध्ये लेखक जसा त्यातील पात्रांना सजीव करतो, तसाच प्रकार इथे दिसतो. डॉ. राजेंद्र माने हे यशस्वी कादंबरीकार आणि निष्णात व्यक्तिचित्रण करणारे लेखक असल्याने आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने हे