पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेक्यासाठी 'व्हई आनंदे जी' या ओळीची रचना गोंधळी म्हणताना करतात. नंतर त्याच गीतात तो देवीच्या तुळजापूर मंदिराचे वर्णन करतो. दीपमाळ ओवऱ्या कशा आहेत सांगतो. पौषात भरणाऱ्या यात्रेचे वर्णन करतो.
 गोंधळी गीते म्हणून या विधीवेळी लोकांना एकदृष्ट्या रिझवत असतात. लोकांचा मोठा समूह त्यांच्या भोवतीने बसून गोंधळ्यांची गाणी ऐकत असतात. गोंधळी पूर्वजांच्या पराक्रमाची वर्णन करणारी गाणीही म्हणतात. ही थोडी शाहिरी अंगाने जाणारी वाटतात; पण मराठेशाहीत या गोंधळ्यांनी लोकांच्यात वीररस निर्माण करण्याचे कामही केले आहे. भाटासारखी स्तुतीपर गीतेही बऱ्याच वेळा गोंधळी म्हणतात. रा. चिं. ढेरे लिहितात, की ‘पोवाडे' गायले आणि जगवले ते गोंधळ्यांनीच. आकुर्थ-शाळीग्रामानी पोवाडे मिळविले ते प्रामुख्याने गोंधळ्यांच्या मुखामधूनच.
 लोक आवडीने गोंधळ्यांची गीते ऐकतात त्यामुळे गोंधळ्याच्या गीतात काही रंजन करणारी गाणीही सापडतात. त्यात मीठमिरचीचे भांडण नावाचे गाणे मनोरंजन करणारे आहे.

मीठ मिरचीचे भांडान
ऐका रोज खटखटीनं जी
मिरची अंगी लईच ताठा
म्हनतीया मी हाई तिखटजी
त्या दोघांनी घरोघरींची
पुरविली हो पाठ जी
मिरची म्हणे माझ्यावीन
न्हाई कोण मोठं जी
झाला मिठाचा जोर
मिरची झाली खराटजी
त्या दोघांचा तंटा मिटेना
फिरा हारीकोर्ट जी
खाली पाटा न वरती वरूटा
तवा मिटतुया तंटा जी

 मिरची आणि मीठ दोन्ही स्वत:चं महत्त्व पटवत राहतात; पण त्यांचा तंटा कधी मिटतो, तर शेवटी त्या दोघांनाही एकत्रित पाट्यावर वरवंट्याखाली वाटलं जातं तेव्हा. अशी विनोदप्रचुर गाणी अधूनमधून म्हटल्यामुळे गाणी ऐकणारी लोकंही रमून जातात. लहान-थोरांना रात्ररात्र भर गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य गोंधळ्यांच्या गाण्यांत असते. गोंधळ्यांच्या गीतांमध्ये अनेक रसांचा परिपोष असतो.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १४२ ॥