पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आकाशव्यापी पाट जो नवलाख तारांगणांनी सजवलेला आहे त्यावर चौक मांडला आहे. तांदळाने चौक भरला जातो. तो इथं चंद्रचांदण्यानी भरला आहे. ब्रह्मांडरूपी कलश त्यावर उभा ठेवला आहे. पाच उसांचे जे मखर ते इथं अग्नि वायव्यादि पाच तत्त्वांनी उभारलं आहे. जी घटमाळ असते ती लांबवली आहे आणि चंद्रसूर्याची दिवटी प्रकाशित केली आहे. हा गीतकाराचा एक प्रकारचा अतिसुंदर असा प्रतिभाविलास आहे. कोणा भानुदास नामक गोंधळ्याची ही रचना आहे.
 या गोंधळगीत रचनाकारांच्या रचनेतही खूप वैविध्य आहे. यात देवीच्या स्तुतीपरच रचना नाहीत. कृष्ण-यशोदेचे गीत आहे, याता चेंडूफळीचं वर्णन आहे. खेळताना चेंडू कालिया डोहात गेला. बासरीनं कृष्णानं भुजंग भारीत केला. त्यावर बसून कृष्ण कालिया डोहातून बाहेर आल्याचं वर्णन आहे.

त्या मुरलीच्या नादे भुजंग झाला सावधान
वर बसुन आले गोविंद गोकुळी झाला आनंद

 कोणा पंढरपूरच्या सोपानकाका साधू यांनी हे गीत लिहिलं असावं. कारण शेवटच्या ओळीत त्यांनी तसा उल्लेख केला आहे.
 तुळजापूरच्या भवानी मातेच्या माहात्म्याचे हे एक विलक्षण सुंदर गोंधळी गीत आढळते, त्यात गाण्याच्या दृष्टीने ठेक्याचे भान ठेवून रचना केलेली आहे.
 दैत्य महिषासुराने धरित्रीला गांजले आहे. लोक हैराण झाले आहेत. अशा वेळी तेहतीस कोटी देव एकत्र आले आहेत आणि त्यांनी देवीची विनवणी केली आहे.

तेहतीस कोटी देव मिळून
केले अंबेचे स्मरण जी
निगाली गं माय तेव्हा होमातून
महिषासुर मर्दिला तिने जी
तव देवक झाले सुख, व्हई आनंदे जी दे जी
तिन ताळ करती मुख, व्हई आनंदे जी
पुढ आगिनं झाड जळती, व्हई आनंदे जी
तुझा महिमा वर्ण मुखे, व्हई आनंदे जी
डंका गेऽऽ वाजे तझ्या दर्बारी
नांदसी तुळजापुरी।

 गोंधळी म्हणतो, होमातून देवी प्रगट झाली. देवांना आनंद झाला. स्वर्ग, मृत्यू पाताळ यांना व्यापून जणू अग्नीचे झाड असल्याप्रमाणे तेजपुंज असे देवीचे रूप पाहून सर्व आनंदित झाले. या गीतात

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १४१ ॥