प्राप्त होत असते. डॉ. राजेंद्र माने यांनी लोकजीवनाला व्यापून उरणाऱ्या आणि समाजधारणेला, व्यक्ती उन्नतीवर भर देणाऱ्या इतर काही बाबींचा परिचय करून दिलेला असल्याने लोकजीवन व लोकसंस्कृती यांचे व्यापकत्त्व अधोरेखित केलेले आहे. धर्म, उपासना आणि माणसाचे लौकिक जीवन या बाबींवर त्यांनी विशेष प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे आपल्या लोकसंस्कृतीचा गाभारा उजळून निघालेला आहे, यात शंका नाही.
डॉ. राजेंद्र माने यांच्या या ग्रंथाचे प्रथमदर्शनी जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या पिढीला आपल्या लोकसंस्कृतीचा परिचय करून द्यावा, अशी भूमिका घेऊन त्यांनी हे लेखन केलेले आहे. त्यांची ही भूमिका आजच्या काळाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची वाटते. कारण लोककला, लोकसाहित्य आणि आपला सांस्कृतिक वारसा यांच्याविषयी नवी पिढी अतिशय उदासीन आहे. त्यातच वाचन संस्कृतीचा झपाट्याने होत चाललेला लोप, खून, मारामाऱ्या, बलात्कार आणि स्त्री-पुरुषांचे भडक स्वरूपातील संबंधांचे आघात, चंगळवादाच्या आहारी गेल्याने निष्क्रिय किया बनलेल्या नव्या पिढीला जगण्याचा आलेला उबग, चावून चोथा झालेल्या साचेबंद प्रेमाच्या त्रिकोणाचे स्वप्नरंजनपर चित्रण करणाऱ्या दूरदर्शन मालिका आणि ऊर फुटेपर्यंत पैशाच्या पाठीमागे लागलेला आजचा माणूस यांना फक्त वर्तमान ठाऊक असतो. भूतकाळाचा त्याला परिचय नसतो आणि भविष्यकाळाची त्याला स्वप्ने पडत नसतात. याशिवाय अप-टू-डेट होण्याच्या हव्यासापोटी पाश्चात्त्य संस्कृतीची गुलामी पत्करण्यात धन्यता मानणाऱ्या या नव्या पिढीला आपला समृद्ध वारसा ठाऊकच नाही; ही आजची शोकांतिका आहे. अशा या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला लोकसंस्कृतीचा परिचय करून देणे, ही एक मौलिक कामगिरी म्हणावी लागेल. ही कामगिरी या ग्रंथाने उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. त्यांनी या ग्रंथात जे-जे विषय निवडले आहेत; त्यांची समग्र, सर्वांगीण अशी विस्तृत माहिती दिली आहे. वासुदेव, जोगती, पोतराज, वाघ्या-मुरळी अशा लोककलावंतांचे मूळ सांगून त्याविषयीच्या विविध पुराणकथा परिचित करून दिल्या आहेत. त्यांचे विधी, पोशाख, धारणा इ. विषयीची विस्तृत माहिती डॉ. राजेंद्र माने यांनी दिलेली असल्याने पाश्चात्त्य व पौर्वात्य अशा दोन्हीही संस्कृतींची अर्धवट ओळख असलेल्या नव्या पिढीला हा ग्रंथ अतिशय मोलाचा वाटेल, असे वाटते. यातून त्यांना आपल्या परंपरेची आवड उत्पन्न होईल. आपला सांस्कृतिक वारसा जाणून घ्यावासा वाटेल. तो जाणून घेतल्यावर त्याचे असणारे वेगळेपण त्याला जाणवेल. त्यातून या वारशाचे संवर्धन करावे, अशी त्याला प्रेरणा मिळेल आणि त्यातूनच आपल्या लोकसंस्कृतीच्या पाथेयाचा त्याला अभिमानही वाटेल म्हणून डॉ. राजेंद्र माने यांचे हे. लेखन या दृष्टीने मौलिक व उपयुक्त स्वरूपाचे म्हणावे लागेल.
डॉ. राजेंद्र माने यांचा हा 'लोकसंस्कृतीचा गाभारा' वाचल्यावर कुणाही अपरिचित वाचकाला