पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणखी एक छोटी कथा सांगितली आहे. त्यात देवीची उपासना आणि लिंब या वनस्पतीचा औषधी गणधर्म या दोन्हीविषयीची सांगड घातली गेलेले आढळते. ही दक्षिणेतील कथा आहे. यातली मरिअम्मा मीळ कवी तिरूवल्लुवर याची पत्नी आहे. तिला देवीचा रोग झाला. अंगावर पुळ्या आल्या. उदरनिर्वाहासाठी तिला घरोघर भिक्षा मागायची वेळ आली. घरोघरी जाऊन भिक्षा मागताना तिच्या अंगावर माशा बसत. त्या ती हातात लिंबाच्या पाल्याचा डहाळा घेऊन हाकत असे. लिंबाच्या पाल्यातील औषधी गुणधर्माने तिच्या देवीच्या जखमा बऱ्या झाल्या असतील; पण पुढे मग तिला देवी कांजण्याची देवता म्हणू लागले.
 हळूहळू सगळीकडे अशा प्रकारचे रोग पसरवणारी देवी वा देवता म्हणून सगळे तिला घाबरू लागले. मरिआईचा कोप झाला, तर गावावर साथीच्या रोगाचे संकट येते, अशी धारणा झाली. मग ते येऊ नये, मरिआई कोपू नये म्हणून तिचा भक्त जो पोतराज त्याच्याकरवी तिची पूजाअर्चा करून तिला शांत करणे चालू आहे.
 मरिआईला संतुष्ट करण्याचा विधी मग लोकसंस्कृतीत प्रचलित झाला. एखादा मंगळवार, शुक्रवार ठरवून मरिआईचा गाडा गावातून फिरवून तो गावाबाहेर नेण्याची प्रथा चालू झाली. मंगळवार वा शुक्रवार हा देवीचा दिवस म्हणून मग तो महत्त्वाचा. या प्रथेत महार जातीतील लोकांना महत्त्व असे. प्रथम अशा प्रकारचा मरिआईचा गाडा फिरविण्यात येणार आहे, हे गावभर दवंडी पिटून कळवले जाई. हा जो मरिआईचा गाडी असे, तो महार लोक तयार करत. ते आंब्याची लाकडे तोडून सुताराकडे देत. सुतार एक छोटा गाडा व दोन मूर्ती बनवून देई. त्या गाड्यात बसवत. गावात फिरून धान्य गोळा केले जाई. दक्षिणाही गोळा करत. धान्याचे पीठ करून त्याच्या घुगऱ्या व आंबील बनवत. दक्षिणेतून लिंब व इतर वस्तू जमवत आणि मग वाजंत्री वाजवत गाडा गावातून नेत. लोक त्यापुढे नारळ फोडत. गाडा जाताना रस्त्यावर आंबीलसडा घातला जाई. घुगऱ्या विखुरल्या जात. हा गाडा गल्लोगल्लीतन फिरे. एकदृष्ट्या देवीच्या आशीर्वादाने गाव बांधला जातो, अशी यामागे धारणा. देवीचा कोप मग गावावर होत नसे. रस्त्यात नारळ, अंडी फोडली जात. गाडा कोणीतरी महार व्यक्ती डोक्यावर घेई आणि मग पोतराजाच्या सांगण्यानुसार कोणत्या विशिष्ट दिशेने गाडा गावाबाहेर घ्यायचे, ते ठरवले जाई. हा मरिआईचा गाडा फिरताना वाजंत्री शिंगे वाजवत तेव्हा पोतराज गाणी म्हणे,

आलीया मरिबाई
तिनं गाड्याचा केला साज
हाती कोरडा त्याला बाक॥
आलीया मरिबाई तिचा कळेना अनुभऊ
भल्याभल्यांचा घेती जीवू

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२३ ।।