पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकांना संरक्षण व सुरक्षा मिळावी म्हणून जोपासली. त्यातील मरिआई ही देवता आहे. दक्षिणेत तिला ‘मरिअम्मा' म्हणतात, तरे महाराष्ट्रात मरिआई.
 पोतराज पुरुष असूनही स्त्रीवेष धारण करतो. स्त्रीसारखे केस वाढवतो, याचे कारणही दक्षिण भागामध्ये जेव्हा देवीची आराधना करायची तेव्हा पुरुष स्त्री वेष धारण करतो, ते देवीला आवडते. जोगतीसुद्धा स्त्रीवेष धारण करून यल्लमाची पूजा व सेवा करतात.
 लोकसंस्कृतीतल्या एका कथेनुसार 'पिरहू' नावाच्या ऋषीची नागावली नावाची पत्नी होती. तिची पतिव्रता म्हणून दिगंत कीर्ती होती. एकदा ब्रह्मा-विष्णू-महेशांना तिची सत्त्वपरीक्षा पाहण्याची इच्छा झाली. त्यासाठी ते आले, तेव्हा नागावलीने त्यांचे तीन लहान बालकांत रूपांतर केले. देवांना राग आला. तेव्हा त्यांनी 'तुझे रूप नाहीसे होऊन तु कुरूप बनशील' असा शाप दिला. क्षणार्धात ती कुरूप झाली. चेहऱ्यावर देवीचे व्रण निर्माण झाले. पिरहू ऋषी परतल्यावर त्यांनी पत्नीचे हे रूप पाहिले व ते संतापले. त्यांनी पुन्हा तिलाच शाप दिला तो असा, की 'तू राक्षसी म्हणून जन्माला येशील आणि लोकांना रोगाने पछाडून त्यांनाही आपल्याप्रमाणे कुरूप बनवशील' पिरहू ऋषींच्या या शापानेच नागावली मरिअम्माच्या रूपात जन्माला आली, असा उल्लेख रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथात केला आहे.
 ही मरिअम्मा निर्मितीची कथाही यल्लमाच्या कथेशी जोडली गेली आहे. जमदग्नी ऋषींनी त्यांच्या पत्नीला गंधर्व दर्शनातून झालेल्या मानसिक पतनासाठी शिक्षा दिली. परशुराम जो त्यांचा पुत्र होता. त्याला त्यांनी मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. त्याच वेळी रस्त्यावरून एक मातंग जातीची स्त्री येत होती. मरिअम्माची ही स्थिती पाहून सहानुभूतीने तिने तिला मिठी मारली. परशुरामाने दोघींची शिरे उडवली. नंतर जमदग्नीनेच प्रसन्न होऊन परशुरामाला हवा तो वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने 'मातेला जिवंत करा' असा वर मागितला. तेव्हा जमदग्नीने मंत्रभारित जल दिले व धडाला शीर चिकटवून त्या जलाच्या साह्याने मातेला जिवंत करण्यास सांगितले. परशुरामाने आनंदाच्या भरात मातंगीचे शिर मरिअम्माच्या धडाला (जी ब्राह्मण होती) व मरिअम्माचे शीर मातंगीचे धडाला चिकटवले. मरिअम्मा म्हणजे ब्राह्मण स्त्रीचे शीर आणि मातंग स्त्रीचे धड यापासून या मरीआई' ची निर्मिती झाली.

 मरीआई काय किंवा यल्लमा काय या दोन्ही देवींच्या उपासनेत लिंबाच्या पाल्याला महत्त्व आहे. यल्लमाचे उपासक म्हणजे जोगती आणि जोगतीणी या सुद्धा लिंब नेसून देवीची पूजा करतात. 'लिंब नेसणे' हा नवस त्यांचे भक्त काही विशिष्ट इच्छा मनात धरून करतात व ती इच्छा पुरी झाल्यावर ते लिंब नेसतात. या मरिआई वा मरिअम्माच्या उपासनेतही लिंबाच्या पाल्याचे महत्त्व आहे. लोकसंस्कृतीतील बऱ्याच कथा एकमेकात गुंफल्याप्रमाणे दिसतात. त्यांचे एकमेकांशी संदर्भ लागतात. त्यात कुठंतरी एक सूत्र सापडते. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ग्रंथात मरिअम्माच्या उपासनेत लिंबाला महत्त्व असण्याची

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२२ ॥