पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

कधी येते आणि त्याला आपण कधी प्रश्न विचारतो, या प्रतीक्षेत असायचे.
 पोतराज नंतर मग ढोलकीचा आवाज वाढवायला लागतो. जी स्त्री डोक्यावर देव्हारा घऊन आली असते, तिच्याही अंगात यायला लागते. ती घुमल्यासारखी करायला लागते. पोतराज आपल्या उघड्या घामेजल्या दंडावर दोरी घट्ट बांधतो आणि हातात दाभण घेऊन पुन्हा देवीला बये! दार उघड' म्हणून साद घालायला लागतो आणि अजून देवी दार उघडत नाही पाहून ते दाभण उघड्या दंडावरच्या नायत कचाकचा मारून घ्यायला लागतो. जिथे त्याने दाभण मारून घेतलेले असते, तेथून रक्त यायला लागते; पण पोतराजाच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेश नसतो. पाहणारे मात्र ते पाहून चित्रासारख स्तब्ध होतात; आणि मग पोतराज एवढ्यावर थांबत नाही. तो स्वत:ला जास्तीत जास्त त्रास करून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो. जणू त्यामुळे देवी दार उघडेल. तो बेभानपणे स्वत:भोवती गोल गिरक्या घेत स्वत:च्या दातांनी मनगट चावून घ्यायला लागतो. शेवटी देव्हाऱ्याचा दरवाजा उघडला जातो. सभोवती जमलेल्या आया-बायांचे हात पटापट जोडले जातात. देव्हाऱ्यात मरिआईची मूर्ती असते. मग देवीला प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम चालू होतो. लोकांचे प्रश्न पोतराज मोठ्या आवाजात देवीला विचारतो. जणू तो माध्यम असतो. देवी त्याच्याशी बोलत असते. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विचारणाऱ्याला सांगत असतो. कधी पावसापाण्याविषयी विचारलं जातं, कधी सांसारिक हालअपेष्टातील प्रश्न असतात. लेकरा-बाळांच्या लग्नाबद्दल विचारलं जातं. त्याची उत्तरं पोतराज देत असतो; पण लोकांना जणू ती देवीनं दिलेली उत्तरं वाटतात. कारण त्यांच्या मते तो देवीचा संचार झालेला माणूस असतो. गावावर काही संकट येणार नाही ना? कोणती साथ गावात येणार नाही ना? हेही प्रश्न मरिआईला विचारले जातात. कारण तिचा कोप झाला तर गाव संकटात येईल, अशी भीतीही खेड्यापाड्यातल्या लोकांना असते. ही सगळी प्रश्नोत्तरे संपली, की मग जमलेल्या बाया देव्हाऱ्यातल्या देवीची पूजा करायला पुढे सरसावतात. सुपातून धान्य आणलेले असते. हळदी, कुंकू, देवीसाठी पाणीही आणलेले असते. काही खण-नारळ लिंबू यांनी देवीची ओटी भरतात. प्रत्येकाची श्रद्धा व आर्थिक स्थितीप्रमाणे देवीलाही भेट-प्रसाद दिला जातो. पोतराज हातात धान्य भरलेले सूप घेऊन ते उभे धरत चक्राकार फिरतो. धान्य गतीमुळे खाली पडत नाही. लहान पोरांना आश्चर्य वाटतं. खरं तर त्यांच्या दृष्टीनं पोतराजाच्या सगळ्याच क्रिया या विस्मयकारक असतात. भीती वाटत असली. तरी आईच्या पदराआडन ती ते सगळं पाहात असतात. हे सगळं झाल्यावर धान्य गोळा करून पोतराज पुढच्या चौकात वा गावात जात असतो.

 डॉ. श्री. द. ता. भोसले यांनी पोतराज' हा द्रविडीयन संस्कृतीमधून आल्याचे सांगितले आहे. रोगराई किंवा समूहावर येणारे अरिष्ट टाळण्यासाठी काही उपासना सुरू झाल्या. त्यात मरिआई व तिचा भक्त म्हणजे पोतराजाचा सामावेश होतो, असं ते म्हणतात. लोकसंस्कृतीने काही देवतांची उपासना

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२१ ॥