श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .
पाहिजे, असा संदेशही देऊन जाते. डॉ. राजेंद्र माने यांनी लिहिलेले हे चौदा लेख म्हणजे लखलखती चौदा रत्ने आहेत. ज्यांचा प्रकाश कधीही मिटणारा नाही. कधीही आटणारा नाही आणि तो विकृतीच्या अंधाराला गिळून टाकणारा आहे. माणसाच्या आसक्तीला विरक्तीचे कुंपण घालण्याचे काम किंबहुना सदैव फणा काढून दंश करणाऱ्या वासनेचे विवेकात रूपांतर करण्याचे काम डॉ. राजेंद्र माने यांनी जी लोकसंस्कृतीची चौदा दालने आपणासमोर खुली केली आहेत, त्यातून साध्य होऊन जाते. आपली लोकसंस्कृती किती श्रीमंत आहे, किती समृद्ध आहे आणि किती सर्वसमावेशक आहे, याचे मनोज्ञ दर्शन डॉ. राजेंद्र माने यांनी “लोकसंस्कृतीचा गाभारा" या ग्रंथात आपणाला घडविले आहे. त्यांनी घडविलेल्या या दर्शनाने आपल्याही मनाचा गाभारा भरून जातो, यात शंका नाही.
एखाद्या राष्ट्राची खरी ओळख आपणाला कोणत्या गोष्टींतून होते? ती ओळख त्या राष्ट्रात असलेल्या सोन्याच्या खाणीवरून होत नसते. हिरे-माणकांच्या राशी आणि मोत्या-पोवळ्यांचे ढिगारे यातून होत नसते. किंवा शरीर सुखोपभोगांची साधने तेथील माणसाच्या पायाशी किती लोळतात, यावरूनही त्या राष्ट्राची खरी ओळख होत नसते. त्या राष्ट्राची समृद्ध आणि गौरवशाली संस्कृती किती वंदनीय आहे, यावरून त्या देशाची ओळख होत असते. ज्या देशाच्या संस्कृतीला प्रदीर्घ आणि वैभवशाली परंपरा आहे. ज्या देशाची संस्कृती सर्वसमावेशक. प्रवाही आणि उबदार आहे. भौतिक आणि आधिभौतिक या दोन्ही क्षेत्रात अत्युच्च पदाला गेलेली आहे, माणूस, समाज आणि निसर्ग यांना कवेत घेऊन सर्वांचा चिरस्थायी अभ्युदय घडविण्यात जी संस्कृती अजोड आहे, ती संस्कृती आणि तो देश स्वत:ची ओळख करून देण्यात यशस्वी ठरत असतो. आपली पाच हजार वर्षांपासून नांदणारी संस्कृती तथा लोकसंस्कृती या कसोट्यांना उतरणारी आहे.
एखाद्या संस्कृतीला किंवा लोकसंस्कृतीला अशी अजोड आणि समृद्ध परंपरा अनेक कारणांनी प्राप्त होत असते. अनेक घटकांनी ती श्रीमंत बनत असते. त्या संस्कृतीमधील धर्मविचार, तत्त्वज्ञान, दैवते, जीवनविषयक मूल्ये; उपासना पद्धती, धार्मिक विधी, श्रद्धा, धारणा, संकेत, सण, सोहळे, यात्रा, जत्रा, कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध, जीवनशैली, खेळ, उद्योग, मंत्रतंत्र, शास्त्र, भाषा, साहित्य, शिल्प, कलोपासना, उपजीविकेची साधने, वस्त्रे, प्रावरणे, दागिने, पाप-पुण्याविषयीच्या धारणा, जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरची धारणा; भूमी, निसर्ग, पंचमहाभुते, पशू, पक्षी इतर प्राणीसृष्टी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक बाबींच्या एकात्म रूपांतून लोकसंस्कृतीची ओळख होत असते आणि लोकसंस्कृतीची समृद्धीही समजत असते. जीवित संरक्षणाची धारणा, श्रमाची बचत, सुखाची साधने, सर्जनाविषयीची भूमिका आणि अदृश्य शक्तीची उपासना पद्धती या पाच गोष्टींवर कोणत्याही लोकसंस्कृतीची श्रेष्ठता अवलंबून असते, या महत्त्वाच्या पाच गोष्टींतून तिला वेगळेपण