पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कडवट भावना उत्पन्न झालेली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अभिमानी देश आमचा धर्म, आमची संस्कृती, आमची जीवनशैली हीच श्रेष्ठ, आदर्श आणि अनुकरणीय असल्याने त्यांचा स्वीकार या मागासलेल्या राष्ट्रांनी करावा, अशी एक सुप्त भावना मनात ठेवून हालचाली करीत असतात. त्यातच जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि आंधळे अनुकरण यामुळे आपली प्राचीन भारतीय संस्कृती विशेषतः लोकसंस्कृती झपाट्याने लोप पावत चाललेली आहे. विस्मरणाच्या खोल गर्तेत ढकलली जात आहे. आणखी काही वर्षांनी आपल्या संस्कृतीची नामोनिशाणी शिल्लक राहणार का, असाच प्रश्न जाणकारांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते.

 आपल्या संस्कृतीमधील साऱ्याच गोष्टी गौरवशाली आहेत, म्हणून त्यांचे जतन केले पाहिजे अशातली बाब नाही. आपल्या संस्कृतीमध्येही काल प्रवाहाबरोबर अनेक हीन नि निंद्य गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा आधार घेऊन अघोरी शोषण झाले आहे. माणसाला एक माणूस म्हणून मिळणारी वागणूक इथे विसरली गेली अहे. धार्मिक कर्मकांडांचा अतिरेक, त्यातून होणारे शोषण वर्णाश्रम व्यवस्था, जातीयता, स्त्रियांना दिली जाणारी अमानुष वागणूक, तिच्यावर घातलेली बंधने, सामान्य माणसाच्या नशिबी आणली गेलेली गुलामगिरी, ज्ञान व धर्मकृत्यविषयीचे काटेकोर नियम, पापपुण्याच्या स्वार्थी आणि भ्रामक कल्पना, स्पृश्यास्पृश्यभाव आणि या सर्वांमधून सामान्य माणसाची होणारी लूट, होणारी कुचंबणा; होणारी मानहानी यासारख्या अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीत निर्माण झाल्या आहेत. या साऱ्या गोष्टी त्याज्य आहेत. निंद्य आहेत. म्हणून आजही त्यांचे जतन करणे, त्यांचा अभिमानाने उल्लेख करणे सर्वथा गैर म्हटले पाहिजे. मात्र, आपल्या या संस्कृतीमध्ये जतन करण्यासारखे आणि मिरवण्यासारखेसुद्धा खूप आहे. आपल्या संस्कृतीने पंचमहाभूतांचा केलेला गौरव, भूमी आणि निसर्ग यांच्याशी जोडलेले आत्मीय नाते, एकत्वात अनेकत्व आणि अनेकत्वात एकत्व पाहण्याची विशाल दृष्टी, सहजीवन आणि सहकार्य या गोष्टींना संस्कृतीत असणारे स्थान, पशू, पक्षी, प्राणी, कीटक, पाणी, पाषाण यांच्या ठायी कल्पिलेले देवत्व, संवर्धन, सर्जन अणि संगोपन यांच्या अधिष्ठानावर साकार केलेले आचार-विचार आणि भौतिक सुखापेक्षा आत्मिक समाधानाला आपल्या संस्कृतीने दिलेले श्रेष्ठ स्थान या गोष्टी चिरंतन स्वरूपाच्या, जीवनाला उन्नत करणाऱ्या, तसेच सार्वकालिक महत्त्वाच्या आहेत. या साऱ्यांचे जतन आणि आणि जोपासना करणे आज आपल्या अस्मितेसाठी नितांत गरजेचे आहे. माणसाचा 'आतून' आणि 'बाहेरून' असा सर्वस्पर्शी समग्र नि चिरस्थायी विकास करण्याचे सामर्थ्य आपल्या संस्कृतीच्या गाभाऱ्यामधे ओतप्रोत भरलेले अहे. असा हा ओतप्रोत भरलेला अमृताचा गाभारा डॉ. राजेंद्र माने यांनी आपणासमोर ठेवलेला आहे. त्यांनी घडवलेल्या संस्कृतीच्या गाभाऱ्याचे दर्शन आपणाला तृप्त करून जाते. मुक्तीची प्रेरणा देते आणि नव्या नजरेने या गाभाऱ्याकडे पाहिले