पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावणीसदृश्यता असते. तिने नऊवारी लुगडे नेसलेले असते. कपाळाला भंडारा माखलेला असतो. नाचताना ती एका हाताने घोळ वाजवते किंवा काही ठिकाणी नाचताना देव्हाऱ्यातली लहान घंटा घेऊन नाचताना ती आढळते. वाघ्या तुणतुण्याची साथ देत असतो. ही जागरणाची गाणी मुरळीच्या नृत्यामुळे असेल; पण लोकांना आवडतात. जागरण हा एक कुलाचार असला, तरी त्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे. वाघ्याच्या पोशाखात तो गळ्यात एक कातडी पिशवी अडकवतो त्यात भंडारा असतो. तो जागरणापूर्वी बसलेल्या प्रत्येकाच्या कपाळाला हा भंडारा लावत असतो. कधी त्याच्याजवळ ध्वज असतो. तो काठीलाही बांधलेला असतो. कधी दिवटी-बुधली असते, तुणतुणं असतं वा घोळ असतो.शंख. डमरू असते. यातल्या सगळ्या वस्तू नसल्या, तरी एखादी वस्तू त्याच्याजवळ असतेच.
 खरं तर मुरळी हा शब्द दक्षिणेतील राणी मरळी हिच्यावरून आलेला असावा, असं जाणकारांचं मत अहे. त्या राणीची एक लोककथा सांगण्यात येते. त्या राणीनं सर्वप्रथम स्वत:ला देवाच्या सेवेला वाहून घेतलं होतं. त्यापाठीही एक कथा आहे.
 एका वृद्ध तपस्व्याला एक लहान मुलगी सापडली. त्याने तिचा सांभाळ केला. तिचे नाव ती पहाटे सापडली म्हणून 'प्रभाती' ठेवले. ती मोठी झाल्यावर सद्गुणी, सुंदर व तपाचरणी बनली. तिची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या काळी कोप्पम प्रदेशावर ‘मरळी' नावाची स्त्री राज्य करत होती; पण ती अधार्मिक होती. प्रजेवर अन्याय अत्याचार करणारी होती. तिने स्वत:च्या राज्यातील राजपुरोहिताचा छळ करून त्याला हाकलून दिले होते. त्या राजपुरोहिताला प्रभातीची कीर्ती कळाली. त्याने प्रभातीला राणी मरळीच्या अत्याचाराबद्दल सांगितले. प्रजेच्या छळाविषयी सांगितले. ते ऐकून प्रभाती राणीचे मन वळविण्यास राजवाड्यात गेली; पण राणीने तिचा अपमान करून तिला हाकलून दिले. प्रभातीने लोकांना देवाची पूजा-अर्चा करण्यास प्रवृत्त केले. देव प्रसन्न होऊन प्रजेला भरपूर अन्नधान्य झाले. लोक प्रभातीला मानू लागले. लोकांनी देवाचे मंदिर बांधले. प्रभाती मंदिरात राहून लोकांना उपदेश करू लागली. राणी मरळीने सैनिकांना ते मंदिर उद्ध्वस्त करायला लावले; पण ते प्रभातीच्या अंगाला हात लावताच भस्मसात झाले. राणीने प्रभातीच्या अंगावर नाग सोडले; पण ते प्रभातीपुढे फणा टेकवून निघून गेले. नंतर राणीने दोन वाघ प्रभातीवर सोडले; पण ते प्रभातीच्या पायावर डोके ठेवून उलट राणीचाच पाठलाग करीत राजवाड्यात आले. राणी भयभीत झाली. केलेल्या कर्माचा तिला पश्चात्ताप झाला. प्रभाती राजवाड्यात आल्यावर राजवाड्यातले वाघ निघून गेले. राणीला प्रभातीचे सामर्थ्य समजले. ती प्रभातीला शरण गेली. राणीने मग देवाचे मंदिर उभे केले. स्वत:ला देवाच्या सेवेस आधीन केले.राणी मरळीला नृत्य, गायन यायचे. नाचून-गाऊन तिने देवाची सेवा केली. तिने देवासाठी सर्व सोडून दिले म्हणून तिला पहिली देवदासी समजतात.

 देवदासीचा उल्लेख यल्लमाचे भक्त म्हणूनही येतो, पण मरळी नावाने 'मुरळी' असा लावून ती

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११४ ॥