पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूर्ती चतुर्भूज असतात. त्याच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू व पानपात्र या वस्तू असतात. सोबत कुत्रा असतो, खंडोबाचे वाहन घोडा असते. खंडोबा हा शिवाचा अवतार मानला गेल्याने काही ठिकाणी खंडोबाच्या मूर्तीजवळ नंदीही आढळतो. घोड्यावर बसलेल्या मूर्तीत कधी खंडोबा एकटा असतो, तर कधी म्हाळसा व बानू याचे समवेत असतो. महाराष्ट्रात व कर्नाटकात खूपजणांचे कुलदैवत म्हणून खंडोबा देव्हाऱ्यात पुजला जातो त्यावेळी शक्यतो ‘टाक' या स्वरूपात त्याचे पूजन होते. हे टाक सुवर्ण वा चांदीच्या पत्र्याचे बनवलेले असतात. अश्वारूढ प्रतिमा त्या पत्र्यावर उठावाने बनविलेली असते. लग्नात वा इतर मंगल कार्यात या कुलदैवताच्या पूजनाचा खास विधी असतो. या टाकावरच्या प्रतिमेत खंडोबाच्या पाठीमागे त्याच घोड्यावर बसलेली म्हाळसाची प्रतिमाही असते.
 संस्कृत श्लोकाच्या ध्यानामधून खंडोबाचे वर्णन केले आहे. त्यात ग्रंथानुसार थोडेफार फरक आहेत. काही ध्यानात चतुर्भूज भैरवमूर्ती जिने त्रिशुल-डमरू-पारा-खड्ग धारण केले आहे. काही ध्यानात मांडीवर म्हाळसा, पांढरा घोडा, हातात खड्ग डमरू, दैत्याच्या (मल्ल-मणि) डोक्यावर पाय, सभोवती कुत्रे, भंडारा उधळलेला असंही वर्णन येतं. रा. चिं. ढेरे यांनी 'खंडोबा' या दैवतावर खूपसे संशोधन केले आहे. देवीचे भक्त म्हणून जसे गोंधळी असतात किंवा भुते असतात तसे वाघ्यामुरळी हे खंडोबाचे उपासक आहेत. गोंधळी 'गोंधळ' घालतात त्यात देवदेवतांना आवाहन करतात, तसेच वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे 'जागरण' करतात. वाघ्या आणि मुरळी हे गेले कित्येक वर्षे ग्रामीण भागात खंडोबाचे जागरण करीत आहेत. लग्न असो वा एखादा नवस त्यात जागरण हे होतेच. यल्लमाला जशा देवदासी वाहिल्या जातात थोडंफार तसंच वाघ्या आणि मुरळीबाबतही आहे. खंडोबाला काही ना काही नवस बोलला जातो, तेव्हा तो पुरा झाल्यावर पहिलं मूल देवाला वाहिलं जातं. मग तो मुलगा असेल तर त्याचा 'वाघ्या' होतो व मुलगी असेल, तर तिला 'मुरळी' म्हणतात. देवदासीबाबत जे घडतं तेच मुरळीच्या प्राक्तनात असतं. शक्यतो सगळ्या दक्षिण भारतात हे वाघ्या-मुरळी आढळून येतात. या मुरळ्या लग्न करत नाहीत. खंडोबाशीच जणू त्यांचे लग्न झालेले असते. परिणामी खुप वेळा समाजाच्या घटकांकडून अशा मुरळ्या देहभोगासाठी वापरल्या जातात.
 वाघ्ये हे दोन प्रकारचे असतात. एक घरवाघ्ये आणि दुसरे दारवाघ्ये. घरवाध्ये म्हणजे एखादा नवस करून तो फेडण्यासाठी काही काळ वाघ्याचा वेष करून खंडोबाच्या जत्रा वा वारी करणारे आणि दारवाघ्ये म्हणजे कायमस्वरूपी वाघ्ये झालेले. दीक्षा घेतलेले. हे आयुष्यभर वाघ्ये बनून खंडोबाची सेवा करत राहतात. मुरळीबरोबर घेऊन ते सगळीकडे जागरणे करीत असतात. खंडोबा संबंधीत धर्मकृत्ये पार पाडत असतात. या धर्मकृत्यात जागरण करण्याबरोबर लंगर तोडणे हाही विधी असतो.

 वाघ्या-मुरळी जेव्हा जागरणे करतात, तेव्हा त्यातही नृत्याचा भाव असतो. मुरळी नाचते त्यात

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११३ ॥