पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या अवताराला 'मल्हारी-मार्तंड' असं म्हणू लागले. कर्नाटकात मल्लारी' व महाराष्ट्रात 'मल्हारी' असे झाले. यानंतर सप्तर्षांनी मार्तंड भैरवाला विनंती केली, 'देवा, जिथे तुम्ही मार्तंड भैरव रूप धारण केले व आमचे रक्षण केले त्या ठिकाणी तुम्ही स्वयंभू लिंगरूपाने सदैव राहावे' हे स्थान प्रेमपूर' नावाने प्रसिद्धीस आले.
 लोककथांमध्ये मल्हारी, म्हाळसा आणि बानू यांच्याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. वाघ्यामुरळी जागरणामध्ये जी अनेक गीते गातांत त्यात त्याचे वर्णन येते. म्हाळसाशी लग्न झाल्यावरही मल्हारी एकदा फिरत असताना त्याला धनगराच्या कुटुंबातली बानू दिसली. तिचं सौंदर्य पाहून तो लुब्ध झाला. म्हाळसाबरोबरचा सारीपाटाचा डाव तो मुद्दाम हरला आणि त्याने ठरवलेल्या अटीप्रमाणे तो बारा वर्षांच्या वनवासाला गेलाः पण खरंतर त्याला बानूला भेटायचे होते म्हणनच म्हाळसापासन दूर जाण्यासाठी त्याने ही अट ठेवली होती व तो मुद्दाम हरला होता. म्हाळसाला बिचारीला त्याच्या मनातल्या या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. हा मल्हारी म्हणजे खंडोबा तेथून निघाला ते भुलेश्वरला आला. भुलेश्वर म्हणजे देवांचा गुरू. त्याच्या आदेशाने मग खंडोबा धनगराचे रूप घेऊन ज्या ठिकाणी बानू होती त्या कळपात सामील झाला. तिथे त्याने सर्वसामान्य धनगरांप्रमाणे वर्तन आचरण्यास सुरवात केली. बानूच्या पित्याच्या सातशे मेंढ्या आणि शेळ्या त्याने नदीवर नेल्या आणि मग मुद्दामच त्याने त्या मारल्या, सोलल्या त्याची हाडे वेगळी केली. बानू आली तेव्हा तो म्हणाला, 'तू जर माझ्याशी लग्न करशील, तर या मेंढ्या मी जिवंत करतो.' नाईलाजाने मग बानू तयार झाली. मग खंडोबाने तिला घोड्यावर घेतले. मेंढ्या जिवंत केल्या आणि स्वत:चे मूळ रूप धारण केले. धनगरांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले. खंडोबा बानूला घेऊन परतला. खंडोबाबरोबर बानूला पाहून म्हाळसा चिडली. मग खंडोबानेच तिची समजूत घातली व जेजुरीचा वरचा अर्धा डोंगर म्हाळसेला व अर्धा खालचा डोंगर बानूला वाटून दिला.
 नंतर या मूळ कथेमध्ये अनेक उपकथानके सामावली गेली असावीत. प्रतीकात्मक रूपात खंडोबाची पूजा केली जाते, तेव्हा वेगवेगळी प्रतीके पूजेसाठी वापरण्यात येतात, त्यामध्ये लिंग, तांदळा, मूर्ती, टाक, मुखवटा, ध्याने ही प्रतीके आढळतात.

 लिंग ही स्वयंभू असतात. अचल असतात तर तांदळा म्हणजे न घडविलेली उभट आकाराची, वर निमुळती होत गेलेली शिळा असते. पूर्वी कापडी मुखवटे पूजेसाठी वापरले जात. आजकाल मात्र खंडोबाचे असे मुखवटे पूजेसाठी प्रतीक म्हणून वापरल्याचे आढळत नाहीत. खंडोबाच्या मूर्ती मात्र पूजेसाठी सर्रास वापरल्या जातात. जिथे-जिथे खंडोबाची स्थाने आहेत, तिथे धातू स्वरूपातील मूर्ती भक्तांना विकत मिळतातही. देवस्थान ठिकाणाच्या मूर्ती कधी बैठ्या उभ्या तर अश्वारूढ अशा दिसून येतात. मांडी घालून बसलेल्या मूर्तीच्या गुडघ्याखाली 'मणि-मल्ल' या दैत्यांची मुंडकी दिसतात. या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११२ ॥