पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेतच; पण समाजातही त्यांना वेगळे स्थान आहे. 'जागरण' नावाच्या विधीमधून खंडोबाच्या कर्तृत्वाचा जागर घातला जातो. लोककथा पाठीमागे ही काही पुराणोक्त इतिहास आहे, ते जाणण्याचं एक वेगळं कुतूहल आणि उताविळी या म्हाळसा-बानूच्या लोकगीतांमधून निर्माण होते.
 'मल्लारिमाहात्म्यम्' या संस्कृत ग्रंथामध्ये मल्लारी' ची अवतारकथा वर्णन केलेली आहे. आदिक्षेत्र 'प्रेमपूर' (पेंबर) हेही खंडोबाचे एक क्षेत्र मानले जाते. तशी महाराष्ट्रात जेजुरी, पाली, औरंगाबादजवळ सातारे, पुण्याजवळ कोंढापूर, इस्लामपूरजवळ पेठ, नगर जिल्ह्यात नेवासे अशी काही ठिकाणे खंडोबाची आहेत. कर्नाटकात मंगसुळी, मैलारलिंग, मैलारपूर वगैरे ठिकाणीही खंडोबाची देवस्थाने आहेत. आदिक्षेत्र प्रेमपूरच्या अनुषंगाने मल्हारीमाहात्म्यमध्ये एक अवतारकथा येते.
 कृतयुगामध्ये मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी तप आचरीत होते. त्या काळात जेव्हा ऋषी असे यज्ञ किंवा तप करत, तेव्हा दैत्य त्यात विघ्न निर्माण करत. 'मल्ल' नावाचा एक दैत्य सप्तर्षीच्या तपात विघ्न करू लागला. त्याने तपोवनाचा नाश केला. ऋषींनाही विहिरीत ढकलून दिले. यातून मार्ग व सुरक्षिततेसाठी समस्त ऋषी इंद्राकडे गेले; पण मल्ल' आणि 'मणि' या दैत्यबंधूंना ब्रह्मदेवाने अजेयत्वाचा वर दिला हे इंद्राला माहिती होते. तो काही करू शकत नव्हता. त्याने विष्णूकडे जाण्यासाठी ऋषींना सांगितले. विष्णूने शिवशंकराकडे जाण्यास सांगितले. अशारीतीने सर्व ऋषी शेवटी शंकराकडे आले. शिवाने ते ऐकून क्रोधाने जटा आपटल्या त्यातून विक्राळ महामारी निर्माण झाली. ऋषींनी तिला घृत पाजून शांत केली म्हणून तिला 'घृतमारी' म्हटले गेले. नंतर शिवशंकराने या दैत्यांच्या विनाशासाठी मार्तंड भैरवाचे रूप धारण केले. त्याच्या रूपाचे वर्णन करताना ग्रंथकारांनी गळ्यात महासर्पाचे भूषण, कानात चंडमार्तंड कुंडले, हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग आणि पात्र, वक्षावर रूळणारी रूंडमाळा, मस्तकावर चंद्रकोरीने युक्त असा मुकुट, तीन नेत्र आणि भालप्रदेशावर भंडारा चर्चिलेला असा मार्तंड भैरव नंदीवर आरूढ झाला. अशा शंकरासोबत कार्तिकस्वामी होते. सप्तकोटी गणांचे सैन्य होते. प्रत्यक्ष गणेशही बरोबर होते.

 असं सैन्य समोर पाहून मल्ल दैत्य घाबरला. दोन्ही सैन्यांत युद्ध झाले. खड्गद्रष्टाला कार्तिकस्वामीने अडवले व ठार केले. गणेशाने उल्कामुखास ठार केले. नंदीने कुंतलोम्यास ठार केले. हे पाहून मंग क्रोधीत होऊन मल्ल-मणी दोन्ही दैत्य मार्तंड भैरवाशी युद्ध करण्यास पुढे आले. मग त्यांच्यात मायावी, द्वंद्व अशी युद्धे झाली. मार्तंड भैरवरूपी शिवाने मग मल्लाला जमिनीवर पाडले व त्रिशुळाने त्याचे वक्ष घायाळ केले व त्याच्या मस्तकावर पाय देणेस पाय उचलला तेव्हा मल्लाने मार्तंड भैरवाची स्तुती करून त्याला शरण आला व त्याला म्हणाला, “देवा माझे नाव तुझ्या आधी असावे व माझे शीर तुझ्या चरणाखाली निरंतर राहावे." शिवस्वरूपी मार्तंड भैरवाने ते मान्य केले. जी गत मल्लाची तीच मणीचीही झाली. शिवाने त्याला इष्ट वरदान दिले. त्याच्यावरून मल्ल' वरून मल्लारी - मल्हारी बनले व शिवाच्या

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १११ ॥