पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जगणे धन्य होईल. ते जन्ममरणाच्या फेऱ्यातूनही सुटतील. 'आंधळा'मध्ये तुकाराम म्हणतात,

कैसा झालोसे अंध
मी माझे वाढवुनी
माया तृष्णेचा बाध..
स्वहित न दिसेची
केला आपुला वध

 पूर्वायुष्याकडे पाहताना आंधळ्याच्या लक्षात येते. ज्यांना आपले म्हटले ते दूर पळाले. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत सगळे जवळ राहिले. स्वार्थ संपल्यावर ते सगळे दूर पळाले. एकदृष्ट्या आपणच आपला वध केल्यासारखे झाले. म्हणून मग आंधळा आतापासूनच आता डोळसपणे वागायला सुरवात करा. दृष्टी देणारा विठोबा हा एकमेव आहे. त्याचे स्मरण करा, तोच ज्ञानी दृष्टी देईल.
 समर्थ रामदासांनीही कापडी, जागल्या, डबरी, जोशी, पांगुळ, वीर पांडे, दिवटा, पिंगळा, बहुरुपी, बाळसंतोष, बीजवर, वैरागी, वाघ्या, वासुदेव यासारखी भारुडे लिहिली आहेत, तसेच पशुपक्षीविषयक उंदीर, कुत्रे, गाय, सर्प व खेळ सण-उत्सव यात चेंडू, टिपरी, लपंडाव वगैरे होळी, गोंधळ सारखी भारुडे लिहिली आहेत. चेटूक, आध्यात्मिक कोडी, झडपणी वगैरे भारुडेही समर्थांनी लिहिली आहेत.
 वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी, कुटात्मकता आणि संवादचातुर्यता ही समर्थांच्या भारुडांची वैशिष्ट्ये आहेत.
 अध्यात्म आणि भक्ती यांच्याबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्यातली व्यावहारिकता ध्यानात घेऊन समर्थांनी भारुडांची रचना केलेली जाणवते.
 पांगुळ लिहिताना ते म्हणतात,

मीपणाचे मोडले पाय
म्हणोनि पांगुळ झालो।
प्रेमफडके पसरुनिया ।
कपादान मागो आलो।
ज्ञानकाठी देई करी।
वैराग्य बोली पांघराया।
राघवाचा धर्म जागो।
अधर्म रे भागो।
अज्ञान निरसुनिया।
विज्ञानी लक्ष लागो।

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०५ ॥