पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामकृष्ण वासुदेवे। वैष्णव गाताती आवघे।
दिंडी टाळ प्रेमभावे। वासुदेवो मन सामावेगा॥
शांतिक्षमा दया पुरी। वासुदेवा घरोघरी।
आनंदे वोसंडो अंबरी। प्रेमे डोले त्रिपुरारिगा।

 हे ज्ञानदेवांनी वासुदेव भारुडातून प्रतिपादले आहे. नाथांचा वासुदेवही मधुसूदनाचे स्मरण करायला सांगतो तसाच ज्ञानदेवांचा वासुदेव म्हणतो, संपूर्ण जग गोपाळाला स्मरल्यामुळे जनार्दनमय होते. सर्वत्र अद्वैत दिसायला लागते. मनात प्रेमभाव निर्माण होतो. वासुदेव घरोघरी हा प्रेमभाव पोहोचवतो. भक्ती निर्माण करतो. संपूर्ण विश्व हेच जनार्दन आहे हे लोकांना पटवून देतो.
 ज्ञानेश्वरांनी पांगुळ अणि सौरीही लिहिली. मनातली द्वैतभावना नष्ट करायची. ती नष्ट करण्यासाठी विठ्ठलाचे नामस्मरण करायचे.

विठ्ठलनाम हेचि सार, जिव्हे प्रेमठसा।
अद्वैत भरिन मन भारिना तोडीन अवपाश।

 ज्ञानदेवांची सौरी विषयवासनांचा त्याग करायला सांगते,

वासना खोडीवेगी टाहो करीन रामनामे।
मा मी टाहो करील रामनामे।
पुंडलिक पेठ संताचे माहेर तिथे नाचेन मनोधर्मे।

 असं सौरीत नामदेवांनी प्रतिपादन केलं आहे.
 एकंदरीत वेदांताचा उपदेश सोप्या भाषेतून सांगण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांनी भारुडामधून केला आहे.
 तुकाराम महाराजांची भाषा सोपी, रसाळ तशीच रोखठोक अशी. तत्त्वज्ञान सोपे बोलीभाषेत मांडण्याचा प्रयत्न तुकारामांनी केला. तुकाराम महाराजांनी रसाळ अभंग लिहिले, तशीच साठच्या आसपास भारुडेही लिहिली. त्यांनीही वासुदेव, पांगळा, जोहार, सरवदा, जोगी, कावडे, वारी, गोंधळ, दरवेश, मुंढा, टिपरी, मलंग, सौरी अशी भारुडे लिहिली. रचनेच्या दृष्टीने शब्दचित्रणात्मक, उपहासात्मक, वर्णनात्मक अशा तीन प्रकारांत तुकारामांची भारुडे दिसतात.

जनी वनी हा अवघा देव
वासनेचा पुसावा ठाव।
श्रीमान मग वोगळतो वासुदेव।
ऐसा मनी वसू द्यावा भाव गा...

 वासनेचे प्राबल्य वाढले, की जिवाला परमात्म्याची आठवण येत नाही. तो वासनेच्या आधीन होतो. वासना नष्ट झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही. या वासुदेवाला जे दान घालतील त्याचे

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०४ ॥