पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आणखी नाथांचे प्रसिद्ध असणारे भारूड म्हणजे जोहार. सर्व संतांना जोहार करणारा महार ही स्वतः संतच आहे व तो परमेश्वराच्या व संताच्या सेवेकरता आला आहे.
जोहार मायबाप जोहार। सकल संतासी माझा जोहार।

मी अयोध्या नगरीचा महार। रामजी बाबाचे दरबारचा की जी मायबाप।

 वेळप्रसंगी परमात्मा धर्मरक्षणासाठी सगुण होऊन अवतार धारण करतो.अशावेळी त्या-त्या काळातले संत त्याच्या कार्यास हातभार लावतात. अधर्माचा केर झाडून परमार्थ मार्ग स्वच्छ करतात.
 इथे भारुडात रामचंद्रांचा सेवक अयोध्या नगरीचा महार, अशी भूमिका नाथांनी घेतली आहे.
 नाथांची भारुडे सर्वसामान्यांना आवडतात, त्याचे एक कारण म्हणजे संसार, नातेसबध या विषयांवरही विनोदी अंगाने त्यांनी त्यांच्या भारुडातून प्रतिपादन केले आहे.

सांगते तुम्हा वेगळे निघा। वेगळे निघून संसार बघा॥
संसार करिता शिणले भारी। सासु सासरा घातला भरी॥
संसार करिता शिणले बहु। दादल्या विकून आणले गहू॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी। मजला वेडी म्हणती कैशी॥
संसार करता दगदगले मनी। नंदा विकल्या चौघी जणी॥५॥
एका जनार्दनी संसार केला। कामक्रोध देशोधडी नेला॥

 इथे सुबुद्धीरूपी नारी जीवरूप नवऱ्याला वेगळे राहण्यास सांगते आहे. थोडक्यात, संसारापासून अलिप्त राहून तटस्थ रीतीने संसाराकडे पाहा. सासू-सासरा याचा अर्थ कल्पना आणि अहंकार असा मानला आहे. यांनी फार दुःख यातना दिल्या. या संसारात शिणल्यावर अविचाररूपी नवरा विकला आणि भावरूपी गहू विकत आणले. या गव्हाच्या पोळ्या केल्या म्हणजे भावाचे भक्तीत रूपांतर केले आणि भक्ती म्हणजे मावशी ती जेवली. संसारात फार दमणूक झाली म्हणून मग इच्छा, निंदा, चिंता आणि ममता नावाच्या चारी नंदा विकून टाकल्या. त्यांचा त्याग केला. असा संसार करताना काम, क्रोधांना देशोधडीला लावले आणि परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न केला. इथे रूपके वापरून संसारसखाचे रहस्य उलगडून दाखविण्याचा नाथांनी प्रयत्न केला आहे.
 असंच आणखी नेहमी म्हणलं जाणारं नाथांचं भारूड म्हणजे.

सत्वर पाव गं मला। भवानीआई रोडगा वाहिन तुला॥१॥
सासरा माझा गावी गेला। तिकडेच खपवी त्याला॥२॥
सासू माझी जाच करती। लवकर निर्दाळी तिला॥३॥
जाऊ माझी फडफड बोलते। बोडकी कर गं तिला॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करते। खरूज येऊ दे त्याला॥५॥

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०१॥