पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संसारातील विषय आमिषास भुलून चालणार नाही. यासाठी इथे मेहुणीचे रूपक वापरले आहे. सुबुद्धी कायम शाबित ठेवली पाहिजे. हे सर्व झाले तर माणसाचे हसू होणार नाही. संसार सुखाचा होईल.
 एकनाथांची काही भारुडं फारशी गायली जात नसली, तरी वेगळी वैशिष्ट्यं असणारी आहेत. आशीर्वादपत्र' हे भारुडही वेगळी शब्दरचना असणारे. यात गायला लागणारी लय कमी असली, तरी अर्थाच्या दृष्टीनं हेही लोकमानसाचं वेगळं प्रबोधन करतं.
 नाथांच्या काळात वापरली जाणारी सरकार दरबारची भाषा नाथांनी यात वापरली आहे. एखादं पत्र लिहावं अशा पद्धतीची शब्दरचना यात आढळते.

चिरंजीव जीवाजीपंत ठाणेदार। वास्तव्य देहपूर।
यासी आत्मारामपंत यांचा आर्शीवाद।
पत्र लिहिणे कारण जे॥ तुम्हास देह गावची सनद।
शंभर वर्षांची देऊन पाठविले। कलम तपशील॥
गावची आबादी करावी॥१॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऐकू नये॥२॥
आशा मनशा यांची संगत धरू नये॥३॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे॥४॥
शांति क्षमा दया असो देणे॥५॥
ज्ञान वैराग्य भजन पूजनी आदर ठेवणे॥६॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले।
तुम्ही तो ते विसरून। सदरीचे कलमास न अनुसरून।
वाईट वागणुकीचा रस्ता काढला॥
तो तुम्हास परिणामी बाधक होईल। सावध राहणे।
एका जनार्दनी शरण। हे आर्शीवाद पत्र ॥७॥

 प्रत्येक मनुष्याला ठराविक कालमर्यादेचे आयुष्य परमेश्वराने बहाल केले आहे. काम, क्रोध यांच्या आहारी त्याने जाऊ नये. परमेश्वराचे चिंतन आणि चांगली वागणूक ठेवून आयुष्य कार्यी लावावे. ज्ञानाची आराधना करावी. भजन पूजन करून साधना करावी; पण हे न करता वाईट वागणूक धरली तर मात्र ते चुकीचे ठरेल. सद्गुरूला शरण जाऊन वागणूक सुधारली जाते. अशा आशयाचे आशीर्वाद पत्रात्मक भारूड हे नाथांच्या वेगळ्या रचनेचे एक उदाहरण आहे.

 अशाच प्रकारची अर्जदस्त, अभयपत्र, जाबचिठ्ठी, ताकीदपत्र नावाची भारुडेही नाथांनी लिहिली आहेत.


.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०० ॥