पान:लोकहितवादी.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुराणे. व्यक्त केलेली मतें शतपत्रांतील मतांहून निराळी नाहीत. म्हणून त्यांची पुनरावृत्ती येथें करीत नाही. लोकहितवादींनी आमच्या जुन्या विद्यांची मनसोक्त निंदा केली असा त्यांच्यावर आरोप अनेक टीकाकारांनी केला आहे व विशेषतः पुराणांस शिमग्याची उपमा दिल्याबद्दल तर सर्वजणांचाच त्यांच्यावर घुस्सा झालेला दिसतो. तेवढ्या विषयापुरतें पुराणांविषयी त्यांचे मत काय होते ते कळावें. म्हणून जरूरीपुरते एकदोन उतारे त्या परिशिष्टांतून वगैरे येथे घेतो. "पुराणे एकंदर अठरा असून, त्यांत प्रत्येक पुराणांत एक देव मुख्य कल्पून त्याची स्तुती व थोडीशी भरीला इतर देवांची निंदा असा प्रकार केला आहे. निदेवांचून म्हणून कोणताही देव या रीतीने शिल्लक राहिला नसून स्तुतीची तर सर्वच ठिकाणी अतिशयोक्ती झाली आहे. पुष्कळ ठिकाणी पुराणांचे लेखक कवित्वांत पसरले.. त्यांनी गौरवार्थ म्हणून जी निंदा स्तुती केली ती आज आपण शब्दशः खरी खोटी मानितो. यामुळे एकंदरीत परिणाम पुराणांनी धर्मात फार घोंटाळा केला एवढाच शिल्लक राहतो. जुनी अठरा पुराणे सोडून दिली तर अर्वाचीन काळी त्यांत घुसडून दिलेली किंवा स्वतंत्र रीतीने लिहिलेली नद्या, क्षेत्रे इत्यादिकांची महात्में, स्तोत्रं वगैरेंनी तर हा घोटाळा ज्यास्तच केला. अर्वाचीन साधुसंतांनी मात्र पुराणांची खरी योग्यता ओळखिली होती असे दिसते. पुराणांच्या एकंदर काळाला हिंदुस्थानच्या इतिहासांतला पडता काळ असें म्हणता येईल. त्यांच्यामुळे जातीजातींतील कलह माजले, एका जातीचे फाजील स्तोम माजलें व इतर जातींच्या मनांत आपल्या हीनत्वाची खोटीच कल्पना दृढमूल झाली. कदाचित् या प्रकारची बरीचशी वर्णनें कोणी तरी मागाहून मूळ पुरणांत घुसडून दिलेलीही असतील. तथापी एकंदरीत पुराणांचा परिणाम अनिष्ट झाला.