पान:लोकहितवादी.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ लोकहितवादी. मते व्यक्त केली जातात. त्यांची वास्तवीक किंमत कळावी एवढ्याचकरितां हे थोडेसें विषयांतर केले आहे. इंग्रजांचा सहवास परमेश्वर कृपेनेच या देशांतील लोकांस झाला आहे असा लोकहितवादींचा दृढविश्वास होता व तो त्यांच्या पत्रांतून व लेखांतून अनेक ठिकाणी व्यक्त झालेला आहे. त्याचप्रमाणे इंग्रज लोकांपासून आमचे लोक शहाणपण शिकतील व आपला राज्यकारभार आपण पाहण्याची हिंमतही लवकरच त्यांचे अंगी येईल असे त्यांना वाटत असे. ४६ नंबरचे पत्र या विषयावर आहे. त्यांत ते म्हणतातः- "इंग्रज लोक यांनी इकडे राज्य संपादन केले. त्याचे कारण काय; याचा विचार करितां दिसते की, हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा वाढला. तो दूर होण्याकरितांच हे गुरू दूर देशांतून ईश्वराने इकडे पाठविले आहेत. पहा, हिंदू लोकांस हा मोठा लाभ आहे की, इंग्रज लोकांचे राज्यामुळे हिंदू लोकांत जागृती झाली व पृथ्वीवर काय काय आहे हे कळू लागले. ज्यास कोंकणापासून पुण्यापर्यंत प्रदेश ठाऊक त्यास पूर्वीचे लोक मोठा माहीतगार असें म्हणत; परंतु आतां बहुतांस इंग्रजांचा प्रदेश, इंग्लंड व अमेरिका माहीत झाली हे सर्व इंग्रजांमुळे झाले. ईश्वराने ही शहाणपणानेच योजना केली आहे. लोकांची झोप जाण्यास दुसरा इलाज नव्हता. सती जाणे जलसमाध घेणं, पोरें मारणे, प्रयागास करवत घेणे,जगन्नाथास रथ उरावर घेणे व हिमालयास स्वर्गास जाणे इत्यादी अघोरी आणि लज्जास्पद चालींमुळे ईश्वराचा क्षोभ अत्यंत झाला तेव्हां दुष्ट लोकांस ताळ्यावर आणण्यास ईश्वराने इंग्रज सरकारची योजना केली. (नं. ५४) दुसऱ्या एका पत्रांत या सहवासापासून होणाऱ्या फायद्यांचे दिग्दर्शन केले आहे, ते असें. आतां हिंदू लोकांनी उघड पहावे की, आम्ही श्रेष्ठ की दुसऱ्या देशाचे लोक श्रेष्ठ. ग्रंथांवरून