पान:लोकहितवादी.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लोकहितवादी. कल्पना वाचकांना आलीच असेल. ती जास्ती स्पष्टपणाने यावी, जे काहीं मत झाले असेल तें तोलून पाहून कमी जास्ती करितां यावें म्हणून मला त्यांच्या चरित्राचे व चारित्र्याचे मर्म म्हणून जे काय वाटतें तें थोडक्यात सांगून मग त्यांच्या ग्रंथांकडे वळतो. ऐहीक व धार्मीक अशा दोन्ही प्रकारच्या भावनांचे, विचारविकारांचे , सुंदर मिश्रण त्यांच्या स्वभावांत झालेले होते आणि याला माझ्यामतें कारणेही तशीच आहेत. त्यांचे घराणे बालबोध जुन्या वळणाचे होते हे मागें सांगितले आहे पण तें शास्त्री किंवा भटभिक्षूक यांचे मात्र नव्हते. त्यामुळे कर्मठपणाकडे लहानपणापासून त्यांचा ओढा थोडासा बेताचाच असावा, होताही. पेशवाईतील वैदिक ब्राह्मणांची घराणी व गृहस्थाश्रमी घराणी यांच्यांत हा भेद अगोदरच झालेला होता. लढायांवर, स्वाऱ्याशिकाऱ्यांवर जाणाऱ्या शिपाई कारकुनांत भटाभिक्षुकांचा कर्मठपणा रहाणे शक्य नव्हते व नाही. देशमूख हे पहिल्या वर्गात मोडत, व त्यांच्या पेशाला अनुरूप अशाच रीतीने त्यांच्या घराण्यांतील पुरुषांची कर्मठपणाची बंधनें थोडी फार ढिली झालेली असतील. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला नित्य कर्म करता येण्यापुरते वेदवेदांगांचे त्यांचे अध्ययन लहानपणी झालेले होते, त्याप्रमाणे स्नानसंध्यादी कर्मे ते नेमाने करीत. याबरोबरच, इंग्रजी शिक्षणाने व विशेषतः इतिहासाच्या अध्ययनानें, निरनिराळ्या देशांचे आचार, त्यांची राजकीय व सामाजीक स्थिती, त्यांचे उद्योगधंदे व व्यापार, त्यांची समाजघटना इत्यादी गोष्टींचें निरीक्षण करून व तज्जन्य सिद्धांत आपल्या परिस्थितीला लावून त्यांना असे वाटत असे की, आपली धार्मीक व सामाजीक बंधनें फाजील जाचक आहेत. इतकेच नाही तर ती तशी आहेत हे चार शहाण्या लोकांना कळत असले तरी ते बोलून दाखविण्याचे धैर्य त्यांच्या अंगांत नाही व कृती करण्याचे तर नाहीच.