पान:लोकहितवादी.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रतिकूल परिस्थिती. काळच्या पिढीत गोपाळराव म्हणजे एक चालता बोलता विश्वकोशच होते असे म्हटले तरी चालेल. ही माहिती त्यांनी मिळविली कशी व केव्हां हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यांचं शाळेतील शिक्षण विविध प्रकारचे झाले होते, किंवा लहानपणी निर्वेध अध्ययन करण्याला त्यांना फारशी फुरसत मिळाली होती अशांतला प्रकार नाही. त्यांचे वडील हरीपंत १८३५ साली वारले व त्या बालवयापासूनच संसाराची कमीजास्ती काळजी त्यांच्यामागे लागली, या गोष्टी मागे सांगितल्याच आहेत. ही विवंचना मागे असतांच त्यांनी तीन वर्षे पुण्याच्या इंग्रजी शाळेत घालविली. हे एवढेच त्यांचे शिक्षण व्यवस्थितपणे झाले. पुढल्या ३।४ वर्षांत नोकरी संभाळन मुनसफीचा अभ्यास त्यांनी केला. बरें, त्यावेळी पुण्याला विद्वान् मंडळी पुष्कळ होती व त्यांचा सहवास गोपाळरावांच्या सारख्या तरुण माणसाला सहज घडण्यासारखा होता असंही वाटत नाही. इंग्रजी शाळेच्या थोड्याफार मास्तरांशिवाय इतर इंग्रजी शिकलेले लोक पुण्यांत त्या काळी फार नव्हते, सरकारी नोकरीत एखादा असला तर आपण आतां शतकृत्य झालो असे समजून त्याचे वाचन बंद झालेले असावयाचे. पुण्याची लायब्ररी सन १८४८ त स्थापन झाली व त्यावर्षी तेथे ३०० च्या वर ग्रंथ नव्हते. इतक्या सर्व गोष्टी प्रतिकूल असल्या तरी एकदोन गोष्टींची गोपाळरावांना अनुकूलता होती. त्या अशाः-त्यांची उद्योग करण्याची हौस फार जबर असे. सांपडला क्षण फुकट घालवावयाचा नाही, कानडोळे उघडे ठेवून चालावयाचे, पुस्तकांतून तर खरेंच; पण त्याहीपेक्षां जग हे जे सर्वात मोठे व सर्वांत विविध असें पुस्तक परमेश्वराने निर्माण केले आहे, त्यांतून मार्मीक बुद्धीने जो जो माहितीचा, ज्ञानाचा कण कांहीं मिळेल त्याचा नम्रपणाने शिष्यभावाने संग्रह करावयाचा, व तो