पान:लोकहितवादी.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न लोकहितवादी. खुद शास्त्रीबुवा व लोकहितवादी यांचा विचारसरणीत फारसा फरक नाही.शास्त्रीबुवांना तरी भटाभिक्षुकांचा,किंवा त्यांच्या कर्मठपणाचा अभिमान मनापासून कोठे वाटत होता ? त्यांची इंग्रजी संस्कृतीवरील श्रद्धा पाहिली, व त्या श्रद्धेला कृतीचे स्वरूप देण्याकरितां त्यांनी किती आणि कसे प्रयत्न केले-निबंधमाला हा देखील त्यांतीलच एक प्रयत्न म्हटला पाहिजे हे लक्षात घेतले म्हणजे लोकहितवादींवर त्यांनी तुटून पडावे,व त्या तुटून पडण्यांत त्यांना इतकें अवसान यावे याची मोठी मौज वाटते. पण त्यांचा स्वभाव, त्यांची परिस्थिती या गोष्टीतच या सगळ्या प्रकाराचे रहस्यही सांपडण्यासारखे आहे. वडील, थोरले शास्त्रीबुवा, यांची बुद्धी बृहस्पतीसारखी:सर्व विषयांत अकुंठीत चालणारी होती तशीच धाकट्यांचीही; कदाचित् कांकणभर जास्त, पण कमी नव्हे. त्यांतून दांडग्या विद्याव्यासंगाने त्यांनी कमाविलेले ज्ञानभांडार त्या वेळच्या मानाने फार मोठे होते. त्यांच्या तोडीचा विद्याव्यासंग कुटे, जिनसीवाले यांच्यासारख्या थोड्याच पुरुषांत त्यावेळी होता. या गुणांचा उपयोग योग्य अभिमानपूर्वक जुन्या संस्कृतीचा उद्धार करण्याकडे, व राष्ट्राचा आत्मविश्वास वाढविण्याकडे करावयाचा, असा श्लाघ्य संकल्पही त्यांनी केलेला होता. पण थोर कुळांत जन्म, चांगली बुद्धिमत्ता, विद्याव्यासंगाची हौस, आणि उत्कट देशाभिमान या गुणांच्या जोडीला चांगल्या विद्येबरोबरच येणारा विनीतपणा असता तर बहार झाली असती. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. याचा अर्थ त्यांच्या अंगी हा गुण कधी आलाच नसता असा मात्र अर्थ नव्हे. ते काही दिवस जास्त जगले असते तर जगाच्या वाढत्या अनुभवाबरोबर त्यांच्या स्वभावांत व उक्तींत मऊपणा आला असता असेंच मत, अशीच आशा खुद्द " लोकहितवादी” यांनी देखील एका प्रसंगाने व्यक्त केली आहे. परंतु ज्या परिस्थितीत ते वाढले