पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ९३

इष्की म्हणवितात. यांनी जर आपल्या स्त्रियांस विद्वान केल्या, तर असे अनाचार करण्याची जरुरी नाही. परंतु हे त्यांस मोठे विरुद्ध वाटते. कारण हे लोक अगदी वेडे झाले आहेत. व त्यांस नीट गोष्ट सांगणारा देशात एकही राहिला नही. सर्व एका राशीचे झाले आहेत.
 सर्व देशांत जितके लोक आहेत, तितके विद्वान नसतात. परंतु काही असतात व त्यांचे आधाराने इतर लोक चालतात. परंतु देशांत दोनशे चारशे तरी शहाणे व लोकांचे हितकर्ते पाहिजेत. मग बाकीचे अडाणी लोक असले तरी चिंता नाही. परंतु जे विद्वान आहेत त्यांस विद्वान समजून त्यांचे मार्गाने वागण्याची इतरांस बुद्धी पाहिजे. सांप्रत हिंदू लोकांमध्ये वास्तविक विद्वान किती एक होत चालले आहेत. परंतु पुष्कळ लोक यांचे सांगितले ऐकावे, असे मानीत नाहीत. यास्तव त्या विद्वानांचा बुद्धिचा उपयोग होत नाही. परंतु मोत्यांची हेळणा कावळे करतात. त्या दृष्टांताप्रमाणे हे आहे. हल्ली जे विद्या शिकून विद्वान झाले आहेत, त्यांचे सांगितल्याप्रमाणे लोकांनी चालावे. अशी लोकांस बुद्धी देण्यास अवकाश आहे.
 ही गोष्ट ज्या दिवशी होईल, त्या दिवसापासून पंचवीस वर्षांत हिंदुस्थानाचा रंग फिरेल. सर्व लोकांस उत्कंठा अशी झाली पाहिजे, की, आम्हांमध्ये विद्वान कोण आहे ? चला त्याची बोलणी ऐकू, त्याचा बुद्धिवाद घेऊ; हे लोकांच्या दुर्भाग्यामुळे झाले नाही; परंतु होईल, यात संशय नाही. परंतु हे होण्यास ब्राह्मणांचा गर्व अगदी निस्तोष गेला पाहिजे. ते अद्याप आपले धुंदीत आहेत. आणि मूर्खपणा आपले जवळ असून, वास्तविक विद्वानांची बोलणी ऐकत नाहीत. प्राचीन काळी आम्हांस देव असे लोक मानीत होते. तसेच आता मानावे असे ते इच्छितात. परंतु आता ते लौकर माणसांसारखे होण्याचा समय आला आहे. आता लोक अज्ञानात नाहीत, हे त्यांणी पुरते समजावे.

♦ ♦