पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२ : शतपत्रे

 परंतु सांप्रत काळी हिंदू लोक म्हणतात की, गायनाची विद्या मुसलमान लोकांची. परंतु त्यांचे लक्षात असे येत नाही की, हिंदू लोकांच्या विद्या मुसलमान शिकले आणि हिंदू लोक विसरले, म्हणून ती विद्या त्यांची झाली असे नाही. परंतु सांप्रत काळी दोन लांच्छने या विद्येस प्राप्त झाली आहेत. एक जे गाणार व नादविद्येत प्रवीण असतात, ते मूर्ख व्यसनी, व भांगे असतात. लोकांस शिकवीत नाहीत, ग्रंथ पहात नाहीत. व मदोन्मत्त होऊन थोडकेसे आले, म्हणजे स्वच्छंद होतात. आणि (दुसरे) दुर्जनांनी या विद्येचा अंगीकार केला आहे व व्यभिचारिणी बहुधा या विद्येस लोकांस लुब्ध करून नादी लावण्याकरिता अंगीकारितात. याजमुळे या विद्येचा हलकेपणा लोकांस झाला आहे. आणि गाणी वाजविणे म्हटले की, लागलेच म्हणतात की अरेरे! छंद वाईट व हलका आहे. सारंगी हातात घेतली किंवा मृदंग हातात घेतला, म्हणजे साजिंदेपणा ठरतो व वीणा घेतला म्हणजे गोसावीपणा ठरतो.
 याप्रमाणे लोकांच्या मूर्ख समजुती पडल्या आहेत. परंतु जर गणित-विद्या चोरटे लोक शिकले किंवा बंडवाले युद्धविद्या शिकले, तर विद्या वाईट झाल्या की काय ? व त्या त्याग करण्यास योग्य आहेत की काय ? स्वर्गसुखाची प्रतिमा नादविद्या आहे, असा असता भांगट लोक व दुष्ट स्त्रिया यांणी तिचा अंगीकार करून चांगल्या लोकांनी त्याग करून, विद्या वाईट असे ठरविले आहे. परंतु हा मूर्खपणा आहे. जर्मन देशांत नादविद्या सरकारी शाळेत शिकवितात. फ्रेंच व इंग्रज म्हणतात की, संभावित गृहस्थ याणी ही विद्या शिकल्याशिवाय त्यांची विद्या परिपूर्ण होत नाही. जसे देशाटण हा विद्याभ्यासाचा भाग आहे, तद्वत् ही विद्या आहे. व बायकांस अवश्य शिकवितात. संभावित गृहस्थांचे स्त्रियांस नादविद्येत प्रवीणता नाही, असे आढळत नाही. अशा शहाणे लोकांच्या चाली आहेत व याप्रमाणे हिंदू लोकांच्या युगांतरी होत्या. कारण की विराट राजाचे कन्येस गायन व नृत्य शिकविण्यास अर्जुन बृहन्नडा या वेषाने राहिला, ही कथा भारती प्रसिद्ध आहे. तेव्हा याविषयी संशय नाही.
 परंतु आताचे हिंदू लोक फार रानटी झाले आहेत. त्यांस निर्मळ ज्ञान, सुख, याचा अनुभव नाही. व त्यांच्या स्त्रियांस ते कुत्र्याप्रमाणेही मान देत नाहीत. मग त्यांस या रमणीय विद्या कोठून शिकविणार ? नवरा म्हणतो माझी बायको कुळंबिणीपेक्षा अधिक. मी मेलो तर इणे जाळून घ्यावे. व माझे पायाचे तीर्थ घ्यावे व माझी पूजा करावी. इला दुसरा देव नाही. याप्रमाणे वर्तणूक करतात. यांस सुधारावयास बहुत दिवस पाहिजेत. घरून उठून गाणे ऐकावयास कसबिणीच्या इथे बहुत लोक सांप्रत जातात. व गाण्याचे, वाद्याचे बहुत लोक