पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४ : शतपत्रे


लोकांची समजूत व पुराणादिकांचे सौरस्य

पत्र नंबर ५९ : ६ मे १८४९

 हिंदू लोकांमध्ये स्वधर्माचा विचार कोणी करीत नाहीत. देवळात अमर्यादा करतात.
 पुणे येथे व इतर ठिकाणी देवांची नावे लोकांनी भांग्या मारुती, छिनाल बालाजी, खुन्या मुरलीधर, चिमण्या गणपती इत्यादी ठेविली आहेत. याजवरून असे वाटते की, देवाचा मान करावा आणि देवास भीत जावे, हा भाव अगदी नाहीसा झाला. देवळे ही पवित्र जागा; त्यात अनाचार असू नये, हे लोक अगदी जाणत नाहीत.
 मला वाटते की इंग्रजांचा धर्म कसाही असो, परंतु त्यांस देव आणि त्याचा मान करणे हे समजते. पहा की आठ दिवसांनी देवळात ते जातात परंतु भक्तीने व मर्यादेने भजन करून माघारे येतात. आणि हिंदू लोकांचे देवळात पहा. कसबिणी बिराडास असतात; सोदे, लुच्चे, संध्याकाळी तमाशे, पहावयास वगैरे येऊन बसतात. त्यांचे मनात देवळांचा मान अगदी नसतो आणि तसे चावडीवर तमाशांत लोक जमतात, किंवा चौथऱ्यांवर पान सुपारी खात बसतात, घरच्या कारभाराच्या गोष्टी सांगत बसतात; तद्वत व्यवस्था आहे. पुण्यात तुळशीबागेत गेले किंवा हिंदू लोकांचे कोणतेही जत्रेस गेले, म्हणजे हेच सर्व दृष्टीस पडते. देवाकरिता भक्तीने येऊन मर्यादेने व पवित्रपणाने वागतात, असा शंभरांत एक मनुष्य असतो.
 स्वधर्म म्हणजे काय, तो या लोकांस अवश्य सांगितला पाहिजे. कित्येक मूर्खास असे वाटते की, पुराणांत जितक्या गोष्टी लिहिल्या आहेत, तितक्या खऱ्या आहेत; परंतु व्यासांनी असेच लिहिले आहे की, स्त्री, शूद्र, वैश्य इत्यादी मूर्ख जनांकरिता पुराणे लिहिली आहेत. ज्ञानी यांस कर्मे व पुराणे यांची गरज नाही, ही गोष्ट खरी आहे.
 कारण पुराणांत कित्येक गोष्टी केवळ मूर्खाचे शासनार्थच सांगितल्या आहेत. जसे वाती करून लावाव्या, याचा वास्तविक अर्थ इतकाच की, अंधेरात उजेड करावा; परंतु ही सोपी गोष्ट सांगण्याकरिता पुराण लिहिणाराने नाना प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत की, जसा एक उंदीर होता, त्याचे शेपूट एक बाई वाती करीत असता चातीस लागून, त्याने चाती फिरून एक वात झाली.