पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ८९

फार देतात; परंतु संपूर्ण ठिकाणी ते यथास्थित लागत नाहीत. कारण की, वास्तविक इतिहास जर असेल, तर त्याजपासून ते राज्य कशाने गेले व लोक शहाण्याचे वेडे कसे झाले व वेड्याचे शहाणे कसे झाले हे कळते व ते दृष्टान्त आपणास लागू करता येतात.
 परंतु पुराणातील तसे लागू करता येत नाहीत; कारण की, पुराणातील सर्व गोष्टी प्रारब्धावर आणि देवाचे सामर्थ्यावर रचिल्या आहेत. असा गजेंद्रास शाप होता म्हणून नक्र झाला; अहिल्येस वर होता, म्हणून उद्धरली. रावणास वानरांनी मारला. दुर्योधनास मारून भूभार कमी करावा, म्हणून युद्ध केले. हिरण्यकश्यपूस मारावयास खांबातून देव निघाला. वामनाने पायाने बळीस पाताळी घातला. या गोष्टी व अस्त्रयुद्ध, रथ-वाहन, धर्मयुद्ध, प्रतिज्ञा, शाप, वरदान, तात्काळ ईश्वराची प्राप्ती, या गोष्टीस आता लागू करणे यासारखा मूर्खपणा, कोठे आहे ? कोण म्हणतो, 'पेशव्यांचे राज्य कसे बुडाले हो ?' दुसरा उत्तर देतो, 'अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार ते झाले. त्यांस उपाय काय ? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले, म्हणजे पाहिजे तसे घडते.' या प्रकारच्या समजुती लोकांच्या आहेत.
 वास्तविक इतिहास पाहत नाहीत व कारण लक्ष्यांत आणीत नाहीत. कोणी म्हणतात प्रारब्ध, कोणी म्हणतात सद्दी; दुसरे म्हणतात ईश्वर करील तसे होईल. म्हणून उद्योग करण्याची गरज नाही. अशा समजुती या सर्व पुराणांतील आहेत. पुराणे यांस मूळ आहेत तसेच व्रतमहात्म्ये व क्षेत्रमहात्म्ये, येणेकरून पुष्कळ वाईट समजुती झाल्या आहेत. पुराणिक व्रत सांगत बसला, म्हणजे अडाणी बायका व चार मूर्ख पुरुष बसलेले असतात. त्यांस व जनावरास काही फरक नाही. यांजमुळे जे पुराणिक सांगतो ते त्यांस खरे वाटते आणि पुराणिक म्हणतो, दोन हजार वाती करून देवापुढे जाळल्या असता महापुण्य आहे; म्हणजे लागल्याच बायका घरी येऊन नवऱ्यासह तगादा करतात की, आमची तुपाची व कापसाची तयारी करावी. आम्हांस पुराणिकबाबांनी सांगितले की, कापूर, वाती व तूप जाळले असता फार पुण्य आहे. मग दोनचार रुपयांचा जिन्नस व दोन महिन्यांची मेहनत खरीखुरीच जाळतात. पुराणिक व भट यांचे सांगितल्यावरूनच बायका आपल्या नवऱ्याच्या प्रेताशी जिवंत जाळून घेत, त्या दोन-चार रुपयांचा जिन्नस जाळावयास कमी करतील काय ?
 याचे कारण काय म्हणाल, तर अज्ञान फार. आम्ही जर आता कोणास सांगितले की, तुमची बायको मेली, तिच्याशी तुम्ही जाळून घ्यावे, तर कोणी