पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८८ : शतपत्रे

एखादी गोष्ट सांगितली, तर तिचा अर्थही करता येत नाही. मग वर्तणूक दूरच आहे.

♦ ♦


पुराणातील ज्ञान

पत्र नंबर ५५ : ८ मे १८४९

 हरएक कोणतेही गोष्टीचे गुणदोष पहावे लागतात. छापखान्याचे हुन्नरापासून किती एक गोष्टी चांगल्या व किती एक वाईट झाल्या आहेत. तसेच दारूपासूनही झाले आहे. तसेच जर कोणते पुस्तक लिहिले गेले, म्हणजे त्यापासून काही गोष्टी चांगल्या व काही वाईट होत असतात. याचा विचार करून चांगली मात्र घ्यावी. हे वाचणाराकडे आहे.
 यावरून मी विचार करितो की, व्यासांनी पुराणे लिहिली, त्यांचे गुणदोष काय आहेत ? व त्यापासून लोकांचा फायदा काय झाला ? ज्या काळी हे ग्रंथ लिहिले त्या काळी हे ग्रंथ लिहिणारास असे वाटले नसेल की, असे आता लोक त्यांस समजतात, तसे समजतील व लोक त्यांची पूजा करतील व घरोघर ते ग्रंथ होतील. त्या वेळी छापखानाही नव्हता. याजमुळे हे ग्रंथ प्रसिद्ध व्हावयास बहुत काळ लागला. आज पाच हजार वर्षे झाली. तरी किती एक पुराणे मिळत नाहीत; कारण त्यांच्या प्रती झाल्या नाहीत. एक प्रत करावयास एक वर्ष पाहिजे. त्याची प्रत दुसरी व्हावयास तसाच पुष्कळ काळ लागतो. अस्तु.
 पुराणे ही माझे मते काव्ये आहेत. त्यांचा आधार बहुतकरून वास्तविक गोष्टीवरून धरला आहे; परंतु त्यात कर्मे आणि बहूक्ती फार केली आहे. कोठे १० श्लोक देवांच्या स्तुतीचे लिहिले, म्हणजे लागलीच त्याची फलश्रुति व त्यांचा न्यास, ध्यान, कवच, छंद, दगड, धोंडे असे पुष्कळ आणून जोडले आहे. मुख्य पुराण करणारांची इतकीच बुद्धी होती की, रमणीय कथा आश्चर्य वाटावयाजोग्या लिहून, त्यात भक्तिज्ञान जागोजाग मिळवून ग्रंथ सुलभ व मौजेचे करावे; परंतु त्या काळी भूगोल, खगोल या विद्या पुरतेपणी वृद्धिंगत झाल्या नव्हत्या. म्हणून भूगोलाविषयी त्यात पुष्कळ चुका आहेत व पृथ्वीची वर्णने मनास येतील तशी कवींनी केली आहेत. भारत, भागवत यातील दृष्टांत लोक