पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९० : शतपत्रे

ऐकेल काय ? पुरुष कोणी ऐकणार नाहीत. कारण की, त्यांना बायकांपेक्षा काही तरी थोडेसे अधिक कळते. परंतु बायका अंधकारात. त्यांस जसे सांगितले तसे वर्ततात. याजमुळे सती जाण्याचा पाठ पडला. जर बायका शहाण्या व त्यांस विद्या वगैरे शिकवावयाची चाल असती, तर ज्यांनी त्यांस प्रथम सती जाण्यास सांगितले त्यांच्या त्यांनी शेंड्या उपटून टाकल्या असत्या. अजूनही जर स्त्रियांस विद्या वगैरे शिकविल्या तर त्या आपला पुनर्विवाह करतील आणि शास्त्री वगैरे जे त्यांस आडवे येतील, त्यांस पुसतील की, पुरुषांनी पाहिजे तितकी लग्ने करावी. मग स्त्रीने नवरा मेल्यावरही दुसरा नवरा का करू नये ? आणि आपण शास्त्रार्थ देऊन चालू करतील.
 परंतु असे होत नाही, कारण की, स्त्रियांस फार अज्ञानात ठेविल्या आहेत यास्तव जे पुराणिक सांगतो, ते त्यांस खरे वाटते. परंतु पुराणात चुका काय आहेत याचा विचार करता येत नाही व लाक्षणिक अर्थ काय आहे व बहूक्ती कोठे काय आहे हे काहीच समजत नाही. परंतु हल्ली म्हणतात की; ज्यांनी पुराणे केली ते देव होते. वास्तविक पाहिले तर ते मनुष्यच होते. व त्यासही वाटले असेल की, आणखी पाच हजार वर्षांनी आमची योग्यता देवासारखी होईल व आम्ही जे जे लिहिले ते त्यातील अर्थ मनात न आणता सर्वच खरे म्हणतील. हे त्यांसही ठाऊक नाही. हिंदू लोक खराखुरा इतिहास एखादे देशाचा वाचून व्यवस्था मनात आणतील तर बरे होईल. म्हणजे त्यांस हे सर्व कळेल, पुराणे ही केवळ कवींची काव्ये आहेत. जो जो संस्कृत भाषा बुडाली, तो तो त्याचे स्तोम वाढत चालले; नाही तर तसे तुकारामाचे अभंग, दोहोरे वगैरे आहेत तद्वतच पुराणांची योग्यता असती. यास्तव पुराणातील मतांमुळे लोक फार मूर्ख व सुस्त झाले आहेत, हे त्यांस अद्याप कळत नाही.

♦ ♦


नादविद्या

पत्र नंबर ५६ : १५ एप्रिल १८४९

 हिंदू लोकांमध्ये नादविद्या व तिच्या शाखा गायन, वाद्य, नृत्य इत्यादीक यास वाईट म्हणतात. याचे कारण मला दुसरे काही दिसत नाही. परंतु या लोकांमध्ये शहाणपण नाहीसे झाले आहे. व विद्या अगदी बुडाली आहे. नाही