पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ८७

किंवा त्यांचा पिता किंवा प्रपितामहाने द्रव्य आणिले नसते. जे राजाजवळ द्रव्य, ते रयतेपासून सर्व घेतलेले असते. याजकरिता त्या द्रव्याचा उपयोग असे दांडगाईने न करावा, परंतु हे मर्म राजे विसरतात आणि विद्वानही विसरतात.
 राजाचे आश्रयाचे विद्वान जे असतात, ते शतमूर्ख होतात आणि विद्या बळेच लपवितात. त्यांस ती बाहेर काढावयाची लाज वाटते. मग इतिहासांत कथा आहे की, शिकंदर बादशाहास जो गुरू होता, त्यांस त्याची अशी प्रार्थना होती की, जी विद्या त्यांस सांगितली, ती त्याने लोकांत प्रकट करू नये. कारण की तेणेकरून राजाचा अपमान होईल. म्हणून त्याचे गुरूने आपली पुस्तके ठेविली आणि प्रकट केली नाही. याच समजुती इकडील लोकांच्या आहेत.
 आता प्रत्यक्ष पहा की, जे विद्वान आहेत, त्याणी विद्या उघड जहाली, असे पाहिले, म्हणजे त्यांचे अंगाची लाही होते. कोणी शास्त्र्यास दाखवा की हा धर्मशास्त्राचा मराठीत तर्जुमा केला आहे. म्हणजे लागलाच तो म्हणेल की, अरेरे! विद्वानांचा थोरपणा गेला ! इंग्रजांनी हे ग्रंथ प्रगट केले. आता शास्त्री व उपाध्ये कशास पाहिजेत ! असे त्यांस वाटते.
 याचप्रमाणे गवईलोक यास म्हणावे की, आपली थोडी विद्या अमक्याला शिकवा. म्हणजे त्याचे घर बुडाले. कोणी म्हणतो, अरे, गुरूचे आर्जव करावे तेव्हा विद्या प्राप्त होते ? विद्या फुकटची नाही. इतका विद्वानांस गर्व आणण्यास व विद्या बुडविण्यास कारण राजे आहेत. त्यांस विद्वानास कोणत्या रीतीने आश्रित करावे, हे समजत नाही. सर्व मूर्खपणा करतात. त्याचा परिणाम असा जहाला आहे की, जे प्राचीन ग्रंथ आहेत, त्याजवर लोक भरवसा ठेवतात, नवीन कल्पना सर्व राहिल्या.
 जी जी औषधे पाच हजार वर्षांचे पाठीमागे लिहून ठेवली आहेत, तीच आज घ्यावयाची. याचे कारण कोणी पुसले, तर शास्त्रांत आहे, म्हणून सांगतात. तशी गायनकलाही बुडाली. राग म्हणजे काय, हेही कोणास समजत नाही, आणि नवीन राग कोणी करीत नाहीत. जे एकदा ग्रंथात मागील काळी ऋषींनी शोध करून ठरविले आहेत, तितकेच. त्याजवर काही एक नाही. सर्व विद्येचा ओघ अटकावला आहे. कोणी विचार करीत नाहीत. काही झाले म्हणजे ही गोष्ट वाजवी किंवा अयोग्य, असे कोणी म्हणत नाही; परंतु शास्त्रांत आहे इतकेच म्हणतात आणि विचार वाढवीत नाहीत. अस्तु.
 हा काळ लवकरच क्षीण होत चालला आहे. लोक शुद्धीवर येतील, तेव्हा याचा विचार बरोबर करतील. सांप्रतकाली ते मूर्ख आहेत. यास्तव त्यांस