पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६ : शतपत्रे

मला सरकारातून पैसा मिळतो, तितक्यापुरते मी राजास मात्र औषध देईन. इतरांस काय म्हणून देऊ ? इत्यादी गर्वाच्या समजुती व निर्दयपणा त्यांचे अंगी आहे. तसाच गवई मोठा प्रख्यात जो आहे तो राज्याचे येथे पाचशे रुपये दर महा खात असतो; परंतु कधी प्राण गेला, तरी तो लोकांस शिकवावयाचा नाही. दोन शेर भांग ओढून घरी बसलेला असेल. आणि राजाचे बलावणे येईल, तेव्हा मात्र त्याकडे जाईल नाही तर तो कोणाजवळ कधी आपला गुण दाखवील, असे होत नाही. व त्यांस असे वाटते की, गरीब लोकांपुढे मी काय गाऊ ? माझी योग्यता केवढी ? मी महान थोर व हे भिकारी. यांचा हिशोब काय ? असे त्यांस वाटते; परंतु विद्वानांचे अंगी इतके दुर्गुण लागण्याचे कारण, जे त्यांस खावयास देतात, ते होत. जर करता राजांनी त्यांस मार्गास लाविले, तर ते लागतील; परंतु राजे त्यांस बळेच मूर्ख व गर्विष्ठ करतात.
 जो कोणी विद्वान आहे, त्यांस राजाने सांगावे की, तुम्हांस दोनशे रुपये (किवा किती त्याची योग्यता असेल तो) दर महा पावत जाईल; परंतु घरी आळसात बसून पावावयाचा नाही, काही शिष्य मिळवा, त्यांस तयार करा, नवीन ग्रंथ लिहा; व ज्यास संस्कृत भाषा येत नाही, त्यासही शास्त्राचे मर्म समजावे, यास्तव संस्कृत ग्रंथाची भाषांतरे करून लोकांसं ज्ञानी करा, तरच तुम्हास पगार मिळेल. असे जर सांगतील तर विद्यावृद्धी होईल. तेवढ्याच खर्चात लोकांचा फायदा होईल, ज्ञान वाढेल, जे विद्वान आहेत, त्यांचे गुण सर्वाचे दृष्टीस पडतील व त्यांचे हातून शिष्य तयार होतील, व येणेकरून विद्वानास गर्व राहणार नाही. व हल्ली जसे विद्वान आहेत, तितक्यास काही तरी लांच्छन असते, तसे असणार नाही.
 परंतु ही गोष्ट राजे वगैरे अमीर लोक आहेत, त्यांस कळत नाही. विद्वानांचे पोषण करावयाचे इच्छेने लाखो रुपये ते खर्च करतात; परंतु ते मातीत टाकीतात. जो विद्वान व थोर असेल, त्यांस पुष्कळ पैसा देऊन राजाने आश्रित करावे; परंतु त्यांस ताकीद असावी की, जे कोणी येतील त्यांस फुकट शिकवीत जावे, औषध देत जावे. त्यास खर्च लागेल तो आम्ही देऊ. आणखी त्याजकडे काही कारखाना सांगावा की, जेणेकरून गरिबांचे हित होईल व विद्वानांचा सर्वांस उपयोग होईल; परंतु हिंदुस्थानांतील राजे बहुधा मूर्ख आहेत. व राजा हा शब्द नेहमी म्हणीत मूर्ख या अर्थावर योजिलेला आहे. याचे कारण असे की, राजे बहुधा मूर्ख असतात. रयतेपासून वसूल करून पैसा घेतात, त्याचा त्यांस बरोबर व्यय करता येत नाही त्यांस असे वाटते की, उत्तम माणसे आमच्या मात्र उपयोगी पडावी व इतर लोकांस त्यांचा काही फायदा नसावा; परंतु राजाने