पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ८५

चौसष्टी उलटण्यात काही अर्थ नाही, हे खचित जाणावे. पोथी घेणे यात लज्जा नाही; परंतु सार्थ वेद म्हणावा. येणेकरून फार चांगले आहे. मनाची सुधारणा होईल, ते करावे. स्मृतीची सुधारणा हे पोपटाचे कर्म. तशीच सहस्रनामे, स्तोत्रे व पूजा ही सार्थ म्हणावी. उगीच मजुरी करू नये. म्हणजे त्यातील अर्थ कळून त्याप्रमाणे वागणूक होईल. बाहेरचे ढोंग दाखवून उपयोग काय ? देवपूजा कंठाळभर मांडली आणि मनात काही नाही, तर ती व्यर्थ आहे.

♦ ♦


स्वराज्यातील विद्वान

पत्र नंबर ५० : ४ मार्च १८४९

 हिंदू लोकांचे राजधानीत काही विद्या वाढविण्याचा प्रयत्न होत नाही. पेशव्यांचे राज्य दक्षिणेत होते; परंतु काही विद्यावृद्धी झाली नाही व विद्यावृद्धी करणे, हा सरकारचा धर्म आहे, असे इकडील लोक मानीत नाहीत.
 जेथे जेथे हिंदू लोकांच्या व मुसलमान लोकांच्या राजधान्या आहेत, तेथे शास्त्री, पंडित, वैदिक, गवई इत्यादी विद्वानांचा समुच्चय असतो; परंतु त्यांच्या विद्येचा लोकांमध्ये काही उपयोग होण्यासारखी तजवीज होत नाही. कशी म्हणाल तर शास्त्री चार शास्त्रपारंगत विद्वान असला, म्हणजे राजाने त्यांस गाव वर्षासने द्यावी, आणि मग शास्त्रीबाची गाठदेखील पडायची मुष्कील. सर्व दिवस घरात बसून असावयाचे आणि सरकारचे वेतन खाऊन स्नान, संध्या, देवपूजा करावयाची. तीत सकाळपासून दोन प्रहरपावेतो सोवळे व दुपारून निद्रा आणि संध्याकाळी क्षणभर बाहेर पडले तर पडले. वर्षासहामासी जेव्हा कचेरीत बोलवणे येईल, तेव्हा मात्र त्यांची विद्या बाहेर पडावयाची; पण तीही नेमलेल्या लोकांतच. तेथे भलत्याचा प्रवेश व्हायचा नाही. असे करून त्यांनी आपले आयुष्य घालविले.
 तसेच वैद्यबाबा. मोठे कीर्तिमान पण गरिबाचे घरी औषध द्यावयास जावयाचे नाहीत व त्यांची गाठ पडावयाची नाही. त्यात दूतचिन्हे वगैरे पाहून वार, तिथी इत्यादी सुलक्षणे मिळतील, तेव्हा वैद्याची पुडी सुटावयाची. तोपर्यंत रोगी मरून जाईल. परंतु वैद्य बाहेर पडणार नाही. त्यांस असे वाटते की;