पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८४ : शतपत्रे

नाही.
 सांप्रतचे ब्राह्मण विद्येविषयी केवळ जनावरे आहेत. त्यांस अर्थज्ञान नाही. येणेकरून धर्मावरील भाव व आस्तिक बुद्धी भ्रष्ट झाली. आणि वेद, शास्त्र, पुराणे ही परवाच किंवा लमाणाचे गाणे यासारखी झाली. देवाचे प्रार्थनेस बसले, म्हणजे जी मर्यादा, निष्ठा व मनाची तत्परता असावी ती नाही, कारण की, हे सर्व गुण ध्वनीपासून येत नाही. अर्थज्ञानापासून येतात व देवांचे महत्त्व हृदयात वागले, म्हणजे सहजच तशी वर्तणूक होते. ज्या शब्दांनी ईश्वराचे वर्णन झाले, ते शब्द जर आपल्यास कळले, तर मात्र त्यासारखी वर्तणूक उत्पन्न होईल. आणि ते शब्द जर अर्थविरहित ऐकले तर तसे होणार नाही. ब्राह्मणांची पढणी आमचे कानी पडतात. त्यांचा अर्थ म्हणणारास कळत नाही व ऐकणारास कळत नाही. उभयता शंख आणि एक मान डोलवितो, व वाः वाः म्हणतो आणि भटांना शाबासकी देतो. जे पाठ म्हणतात आणि अर्थ जाणत नाहीत, त्यांच्यासारखे मूर्ख व व्यर्थ आयुष्य घालविणारे पृथ्वीत थोडेच असतील. मागील युगांत असे वेडे ब्राह्मण नव्हते. ते म्हणत होते. सार्थ म्हणण्याची पद्धती ज्या दिवसापासून बुडाली, तोच दुर्भाग्याचा फेरा, या लोकांस खचित आला. कारण की, याजमुळे ब्राह्मणांचे तेज गेले. भट मूर्ख झाले व त्यांजपासून गृहस्थ असेच करू लागले. जो उठला तो पाठ म्हणतो. 'अरे मूर्खा, पाठ म्हणून फळ काय ?' असे सांगणारा कोणीच नाहीसा झाला.
 मला वाटते की, पहिले ब्राह्मण ज्ञानी होते. परंतु पुढे काही काळाने त्यांची प्रजा ही मूर्ख झाली. पूर्वी सर्व ब्राह्मण पोथीवरून म्हणत असत. आणि पोथीशिवाय म्हणू नये, असे शास्त्र आहे. पुढे ईर्ष्येने म्हणता म्हणता पोथीशिवाय किरकोळ अनुष्ठाने करू लागले. नंतर कोणी त्यांजवर चढ करून सर्व वेद पाठ म्हणू लागले. मग भट वेगळे व श्रौतकर्म चालविणारे ब्राह्मण वेगळे, असे दोन पर्याय झाले; परंतु दोघेही अर्थशून्य, संस्कृत भाषेत पाठ म्हणतात. नमस्कार करावा, विष्णुस्मरण करावे, तांब्यात पाणी ओता, हे देखील शब्द मंत्रात मोडतात. ब्राह्मण संस्कार पाठ करतात. हा मूर्खपणा पाहून चमत्कार वाटतो की, अर्थ जाऊन हे ज्ञानशून्य म्हणणे आले कसे ? आणि हे लोकांस इतके प्रिय झाले कसे ?
 अर्थ म्हणजे शब्दामध्ये जसा जीव. तो जर नाही तर ते शब्द प्रेतवत आहेत. छत्तीस अक्षरांवर हजारो भाषा आणि हजारो शास्त्रे झाली आहेत. म्हणून अक्षरांची मातबरी नाही; परंतु भटमंडळी हे मनात आणीत नाहीत. त्यांनी आता विरखडे ठेवावी, आणि पाठ म्हणावयाचा गर्व सोडून द्यावा व