पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ८३


अर्थशून्य ब्राह्मणविद्या

पत्र नंबर ३३ : २९ आक्टोबर १८४८

 आपले लोकांत ज्ञानशून्यता जहाली आहे. तिचे प्रबळ कारण असे आहे की, लोक अर्थाखेरीज विद्या शिकवतात. ब्राह्मण लोक वेद पाठ करतात. परंतु अर्थशत्रू असतात. तसेच गृहस्थ सहस्रनामे, स्तोत्रे इत्यादी म्हणणारे पुष्कळ आहेत, परंतु अर्थाविषयी शून्य. येणेकरून फक्त तोंडाची मात्र मजुरी करतात आणि मनाचा काही उपयोग करीत नाहीत.
 कोठे कीर्तन व पुराण असले म्हणजे लोक जातात; परंतु कोणी मौज पहावयास जातो, कोणी उगाच दिवे पहावयास जातो, कोणी तंबाखू खात बसतो; कोणी अर्वाच्य भाषणे बोलत असतो; परंतु देवालय पवित्र जागा हे कोणाचे लक्षातच नसते. तसेच भट वेदपाठास जमले, म्हणजे याचप्रमाणे अवस्था होते. व स्वतः म्हणणारे तेही आपले लक्ष देवाकडे लावीत नाहीत. तंबाखू व भांग ओढीत असतात. तसेच लोक पूजा व संध्या करतात; परंतु पुष्कळ गृहस्थांचे येथेही मी असे पाहिले की, पूजेची खटपट रूप्याचे देव्हारे शोभेकरिता मांडतात व ढोंगाकरिता रुद्राक्षाच्या माळा व सोंगाकरिता भस्म लावितात; परंतु मनात तर काही एक नाही; आणि संपूर्ण दरबार कारभार तो रिकामा वेळ समजून करतात. तेव्हा सांप्रत काळचे लोकांमध्ये वास्तविक देवाचे भजन नाही. अक्षरे मात्र पाठ म्हणतात; परंतु अक्षरांनी काही उपयोग आहे काय ? नुसते पाठ म्हणण्याने पुण्य आहे. असे समजतात हेच सर्व धर्म बुडवावयास, व अज्ञानास मूळ झाले आहे. ब्राह्मण मोठा दशग्रंथी म्हणवितो, परंतु त्यांस एका शब्दाचा अर्थ समजत नाही. ज्योतिष, छंद व व्याकरणाचे सूत्र इत्यादी पाठ म्हणतो. आता यासारखा मूर्खपणा कोठे आहे ? व्याकरण, अष्टाध्यायी पाठ म्हणून त्याचा काही उपयोग नाही. जर समजले तर त्याचा उपयोग. ते न होता फक्त पाठ म्हणतात आणि आम्ही विद्वान ब्राह्मण म्हणवितात. त्यांची विद्या कोठे आहे ? जर मनुष्य अर्थ समजणार नाही आणि शब्दांची ध्वनी मात्र करील तर म्हैस रेकली तद्वत मनुष्याने आक्रोश केला, इतकेच झाले. मनुष्याचा भाषणाचा गौरव काय तो अर्थावर आहे. तो अर्थ समजला नाही तर पशु, पक्षी ध्वनी करतात, तसाच तो मनुष्य ओरडतो. परंतु ज्ञानाने बोलत