पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८० : शतपत्रे

गोष्ट बोलण्यास एक क्षण घालविला आहे ? असे शुभ जे आहेत, त्यांची योग्यता किती ? ज्यांनी चार शास्त्रे अध्ययन केली आहेत. त्यांचीदेखील योग्यता इंग्रजीतील पंडिताशी बरोबर नाही. कारण की, मुळी आधी संस्कृत भाषेत ग्रंथ आहेत किती ? ग्रंथांचे संख्येवरून विद्येची तुलना होते, हा नेम आहे. सर्व पुस्तके जर जमा केली, तर फार झाले तर एक कोठडी भरेल. तेव्हा तितकी वाचली किंवा अवलोकन केली, त्याचे शहाणपण सारखे कसे होईल ? जितके बीज तितके पीक. ज्याने पायलीभर दाणे पेरले आणि ज्याने खंडीभर पेरले, त्याचे उत्पन्न सारखे कसे होईल ?
 इंग्रजीमध्ये तर कोट्यवधी ग्रंथ आहेत. त्यांत अनेक विद्या आहेत. तितक्या संस्कृतात नाहीत. चौदा विद्या आणि चौसष्ट कला इतकी संख्या जेव्हा हिंदू लोक फार शहाणे व पराक्रमी व विद्येवर लक्ष देणारे होते व जेव्हा व्यासवाल्मीकी होते, तेव्हा इतकी गणना झाली आहे. परंतु इंग्रजीत एक हजार विद्या आहेत. प्रत्येक विद्येवर हजारोंच ग्रंथ आहेत. संस्कृतात काही विद्या इतक्या सूक्ष्म आहेत की, एक विद्येवर एक ग्रंथ, जसा युद्धविद्येवर धनुर्वेद. दुसरा ग्रंथ नाही व धनुर्वेदही नाहीसा झाला. कोणी वाचीन म्हणेल, तर मिळावयाचा नाही. आणि इंग्रजीत जसे म्हटले तसे आहेत.
 याचे कारण संस्कृतातील विद्येचे चाहाणारे ब्राह्मण होऊन गेल्यास दोन तीन हजार वर्षे झाली. तेव्हापासून ब्राह्मण मूर्ख झाले. विद्या म्हणजे काय, हे देखील विसरले. त्या शब्दाचा अर्थही त्यांस कळत नाही आणि जसे हिंदू लोक व्यासाचे वेळी विद्याप्रवीण होते, तद्वत इंग्रज आता आहेत. त्यांचे चित्त विद्येवर फार व ते ज्ञानी बहुत झाले व त्यांचे ग्रंथ फार उपयोगी आहेत. हिंदू लोकांचे ग्रंथ जेवणावळीचे आहेत. तर इंग्रजी पंडित तो संस्कृतातील पंडितांशी सारखा कसा होईल ? अशी जेव्हा पंडितांची गती, तेव्हा कारकून आणि भट हे काय पदार्थ ? हे तर कसपटे दिसतात. जो इंग्रजीतील पंडित आहे, त्यांस किती विद्येचे ज्ञान असते ? त्याची समजूत केवढी विस्तीर्ण ? आणि त्याचा विद्वानपणा केवढा? त्याची योग्यता लोक समजत नाहीत. त्यांस दूषण लावितात. इंग्रजीतील विद्वानांची अशी योग्यता आहे की, त्यांस कोणताही विषय सांगा, त्याविशी तो ग्रंथ लिहू शकेल, कोणत्याही विषयावर बोलू शकेल. जे जे या पृथ्वीत आणि आकाशांत आले, ते सर्व त्यांस ठाकठीक दिसते. आणि चंद्र फिरतो; याचे आश्चर्य त्यांस वाटत नाही. दगड वरती उडविला, म्हणजे खाली पडतो, याचेदेखील कारण त्यांस माहीत आहे. तात्पर्य त्यांस कोणत्याही विषयी आश्चर्य वाटत नाही.