पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ७९


इंग्रजी विद्या

पत्र नंबर ३१ : १५ ऑगस्ट १८४८

 पुणे शहरात प्रथम १८३२ साली इंग्रजी शाळा घातली, तेव्हा लोकांची अशी समजूत होती की, इंग्रजांचा स्पर्श झाला तर स्नान करावे व इंग्रजांची भाषा शिकली, तर ब्राह्मणपणा जातो. याजमुळे त्या समयी रॉबर्टसनसाहेब कलेक्टर यांनी आर्जवाने गृहस्थांची मुले थोडीशी जमविली. नंतर काही दिवसांनी पुष्कळ लोकांच्या समजुती बदलल्या आणि खुषीने मुले पाठवू लागले; परंतु पहिल्या समजुतीचे ब्राह्मण अद्यापि बहुत आहेत. त्यांच्याने लोकांस इंग्रजी शिकण्यापासून तर बंद करवत नाही; परंतु आपल्या मंडळींत ते असे बोलतात की, जे इंग्रजी शिकले आहेत, ते नास्तिक, निर्दय, अधर्मी, अमर्याद आहेत. परंतु त्यांची योग्यता पाहिली, तर ते केवळ मूर्खाचे शिरोमणी आहेत. जरी त्यांस लिहिता वाचता येते, तरी ते पंडित नाहीत. त्यांची समजूत इतकी क्षुद्र आहे की, लिहिणे आणि वाचणे ही तमाम विद्या, यापुढे त्यांस काही कळत नाही. तत्रापि त्यांस वाटते की, आम्ही सर्वज्ञ आहो. आता असे गर्विष्ट मूर्ख लोक आहेत, त्यांना उत्तर देणे योग्य नाही. कारण की, शुद्ध वेड्यांशी वाद करणे निर्फळ आहे. जरी माझे म्हणणे असे नाही की, केवळ इंग्रजी लिहितात आणि बोलतात ते विद्वान, असे मी म्हणत नाही. कारण की जे कुलकर्णी असतात ते लिहितात. त्यांस पंडित कोणी म्हणावे ? तसेच जे केवळ 'रायटर'च आहेत त्यांस विद्वान म्हणणे अयोग्य आहे; परंतु ज्यांनी विद्येचे रहस्य जाणले आहे व बहुश्रुत आहेत, त्यांचा मात्र पक्ष आम्ही घेतो. आणि आम्हांस ठाऊक आहे की, एक इंग्रजीतील विद्वान आणि शंभर संस्कृतांतील पंडित आणि एक लक्ष कारकून व दोन लक्ष भट हे सारखे कदाचित होणार नाहीत. भटांचे वर्णन आम्ही एके ठिकाणी केले आहे. हल्ली कारकुनांचे थोडेसे करितो.
 ब्राह्मण लोक कारकुनीचा धंदा फार करतात, आणि गृहस्थ म्हणवितात. परंतु वास्तविक पाहिले, तर त्यांस कळते काय ? संध्येची अक्षरे साळुंखीसारखी किंवा राघूसारखी पाठ करतात. मोडीचे लिहितात, वाचतात. साधारण कामकाज कारकुनीचे करता येते. परंतु हे मोठे प्रतीचे मजूरदार, जसे सुतार, न्हावी, धोबी तसेच ब्राह्मण कारकून; यांत त्यांचा विद्वानपणा काहीच नाही. हजारो कारकून आहेत; परंतु एकाने एक ग्रंथ तरी जन्मादारभ्य रचला आहे ? शहाणपणाची