पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७८ : शतपत्रे

प्रथम राज्य संपादन होणे ते त्या राष्ट्रातील जे शहाणे असतात त्यांसच होते. संपादकांस काही तरी विशेष शहाणपण असल्याशिवाय राज्य मिळावयाचे नाही. लोक शहाणे असतील तर बहुतेक अनर्थ टळतील.
 परंतु हिंदुस्थानातील लोक अगदी गयाळी आहेत. त्यांस काही कळत नाही. अद्याप हे झोपेत आहेत. वास्तविक पाहिले तर लोकांमध्ये गुणावरून किंवा विद्येवरून कोणाची योग्यता व मान्यता नसते. जो अमलावर आहे किंवा मोठ्या द्रव्याचे मालकीवर आहे, त्यांस लोक शहाणा समजतात. कवीने वास्तविकच म्हटले आहे की, 'सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ।' हे उदाहरण या लोकांस बरोबर लागू आहे. जर मोठे विद्वान असले आणि गरीब असले तर त्यांस कोणी विद्वान म्हणत नाही. मध्यम असला तरी चिंता नाही, त्याजवळ द्रव्य किंवा अधिकार असला म्हणजे त्याएवढा मोठा कोणी नाही. व त्याची प्रशंसा लोक करतात. असा संप्रदाय आहे. या इतक्या अज्ञानास कारण पाहिले तर मला एक असे दिसते की संस्कृत भाषेत जे ग्रंथ आहेत ते सर्वांस कळत नाहीत. आता संस्कृत भाषेत पाहिजे ते सर्व आहे असे नाहीच. पण आहे तितके कळले तरी लोक शहाणे असते.
 संस्कृत भाषेत ग्रंथ थोडे, भूगोल आणि इतिहास हे मुळीच नाहीत. पुराणात किती एक ठिकाणी असे लिहिले आहे की, हिमालयाचे पलीकडेस किती एक देश आहेत. तेथे अमुक अमुक लोक आहेत. याजवरून तेव्हाचे लोक आताचे सारखे कैदेत नव्हते असे समजते. जरी या ग्रंथास बहुत दिवस झाले व त्यात लिहिले आहे त्याशी आता किती एक गोष्टी मिळत नाहीत, तत्रापि ही गोष्ट खरी आहे की, त्या वेळेस हिंदू लोक सर्वत्र जाऊन विद्या, वाढवीत होते. विद्या म्हणजे स्वदेशात व जे इतर देशात आहे ते सर्व आपल्यास कळावे, याचेच नाव विद्या. अलीकडे किती एक मूर्खपणाचे समजुतीमुळे लोक कैदेत आहेत. म्हणजे त्यांच्या पायात बिड्या आहेत. त्यांस इकडचे इकडे हलवत नाही. जागच्या जागी श्रमी होतात आणि बिड्या तोडावयाजोग्या असूनही ते स्वस्थ दुःख भोगितात, हे आश्चर्य आहे. तात्पर्य बहुत दिवस एखादी गोष्ट चालली, म्हणजे ती सोडवत नाही. विचार असला तरी अंध होतात. आपली सुधारणा कोणते रीतीने होईल, याचा विचार करीत नाहीत. त्यात एकमेकांचे द्वेष व मत्सर फार; याजमुळे कोणी कोणास पुसत नाही. व अशी स्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत यांचे कल्याण होणे दिसत नाही. जोपर्यंत उत्तर देशचे लोक इकडे येत नव्हते. तोपर्यंत हे चालले. आता चालणार नाही.

♦ ♦